शालेय शिक्षण मंत्री यांनी अनौपचारिक गप्पांद्वारे शिक्षण विषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षण तज्ञांशी साधला सुसंवाद

22

शालेय शिक्षण मंत्री यांनी अनौपचारिक गप्पांद्वारे शिक्षण विषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षण तज्ञांशी साधला सुसंवाद

बोरघर / माणगाव
विश्वास गायकवाड
९८२२५८०२३२

माणगांव :- शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांनी दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील शिक्षण तज्ञांशी अनौपचारिक गप्पांद्वारे मनमोकळा संवाद साधला आणि विविध शिक्षण विषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षण तज्ञांची भूमिका जाणून घेतली, महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि काळानुरूप व्हावी यासाठी राज्यातील शिक्षण अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ,भाषातज्ज्ञ यांचेशी माननीय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी अनौपचारिक गप्पांद्वारे सुसंवाद साधला. या गप्पांचा विषय होता शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा
या चर्चेत प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई, शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी, प्रतिभा भराडे, प्रवीण काळम पाटील, संदीप वाकचौरे, शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव सूर्यवंशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. गीता शिंदे तसेच प्रा. डॉ. राजेश बनकर आदी मान्यवर सहभागी झाले होते. खासदार संदीपनजी भुमरे ही यावेळी उपस्थित होते, त्यांनीही मौलिक सूचना मांडत शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि ग्रामीण शाळांच्या समस्या यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली.
बैठकीदरम्यान शिक्षक-विद्यार्थी संबंध, अध्यापनातील सर्जनशीलता, नाट्यकलेद्वारे शिक्षण प्रभावी करण्याचे मार्ग, भाषाशिक्षण, मातृभाषेचे महत्त्व, डिजिटल साधनांचा वापर, तसेच ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी करण्याच्या उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. तज्ज्ञांनी शिक्षणातील नवनवीन प्रयोग आणि जागतिक दर्जाचे मानदंड गाठण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज व्यक्त केली.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सर्व मान्यवरांची भूमिका समजून घेतली आणि पुढील काळात अशा चर्चांचा विस्तार करून त्यातून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा मनोदय व्यक्त केला . “महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण , दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.
या वेळी शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हेल्थ कार्ड विकसित केले जाणार आहे. तसेच “आनंददायी शनिवार” या संकल्पने अंतर्गत राष्ट्रभक्तीपर संगीतमय कवायत, क्रीडा व सैनिकी शिक्षण , याशिवाय शिक्षकांसाठी कला-कीडा स्पर्धा या विषयांवर प्रकाश टाकला,अध्ययन अध्यापनासोबतच सांस्कृतिक व कलात्मक सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली.
बैठकीतून शिक्षक प्रशिक्षण,अभ्यासक्रम समृद्धी, सांस्कृतिक दृष्टिकोनातून शिक्षणाची उन्नती आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे यासंदर्भात सूचना पुढे आल्याने आगामी काळात ठोस निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होईल,आणि पुढील वर्षी राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे चित्र पूर्वी पेक्षाही उत्तम असेल, असा आशावाद व्यक्त केला.