नेरळमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; पक्षत्यागाचा निर्णय लवकरच?

20

नेरळमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; पक्षत्यागाचा निर्णय लवकरच?

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199334

नेरळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचं वातावरण असून, पक्षत्यागासारखा मोठा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर कार्यकर्त्यांवर दोषारोप झाले असून, त्यांना जबाबदार धरण्यात येत असल्यामुळे अनेक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने आणि मनापासून काम केले आहे. मात्र, त्यांच्या योगदानाकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. स्थानिक विकासकामांमध्ये सहभाग, टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणि पक्षांतर्गत सन्मान या सगळ्यांपासून कार्यकर्ते दूर राहत असल्याने असंतोष वाढला आहे.

एका वरिष्ठ कार्यकर्त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही नेहमी पक्षासाठी रस्त्यावर उतरलो, प्रचार केला, मेहनत केली. पण सध्या आम्हालाच पराभवासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. खरे कारण दुसरीकडे असतानाही दोष आमच्यावर टाकला जातो, हे दुर्दैवी आहे.”

या नाराज कार्यकर्त्यांशी अन्य राजकीय पक्ष संपर्कात असल्याचेही समजते. त्यामुळे लवकरच काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर गटात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळमध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली असतानाही, अपक्ष उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान करून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.

राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, जर ही नाराजी वेळेवर हाताळली नाही, तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे नेरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमकुवत होण्याची शक्यता दिसून येत आहे.

पक्षासाठी हा “सिग्नल” धोक्याचा असून, आता वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे.