पीक विम्याला रायगड मध्ये अल्प प्रतिसाद
गतवर्षीच्या तुलनेने जिल्ह्यात 9,917 शेतकऱ्यांची नोंद
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३
अलिबाग:- आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळावा म्हणून यावर्षी खरिप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. नऊ हजार 917 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. गतवर्षी 40 हजार 347 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी पिक विम्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आहे आहे.
पेरणी न होणे, पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान,गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यांसाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 61 हजार रुपये असून, नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये आहे. या योजनेंतर्गत भातासाठी एक एकर क्षेत्राकरिता 183 रुपये, एक हेक्टर क्षेत्रासाठी 457 रुपये हप्ता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नाचणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक एकर क्षेत्रासाठी 35 रुपये व एक हेक्टर क्षेत्रासाठी 87.50 रुपये हप्ता आहे. पीक विम्याची नोंदणी करण्यासाठी ॲग्रीकल्चरल इन्सुरन्स कंपनीमार्फत जनजागृती करण्यात आली होती. शेतावर जाण्यापासून वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून पिक विमा नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. वेगवेगळे फलक तयार करण्यात आले होते. या सर्व प्रयत्नातून अखेर नऊ हजार 917 शेतकऱ्यांनी तीन हजार 834.19 हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली.
मागील वर्षी खरीप हंगामात एक रुपयावर पीक विमा नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. या आवाहनाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतवर्षी 40 हजार 347 अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, यंदा पीक विमा नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेने 30 हजार 430 शेतकऱ्यांनी यावर्षी पाठ फिरवल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.