Home latest News चंद्रपुरातील या गावात होणार गावकऱ्यांसाठी मोफत गरम पाण्याची सोय
चंद्रपुरातील या गावात होणार गावकऱ्यांसाठी मोफत गरम पाण्याची सोय
🛑 आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा पुन्हा एक आगळावेगळा उपक्रम
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
राजुरा : 17 सप्टेंबर
जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त कळमना गाव नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे चर्चेत असते. गावचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी पुन्हा एकदा आपल्या कल्पकतेची छाप सोडत गावकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यापुढे कळमना ग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांना आंघोळीकरिता मोफत गरम पाणी उपलब्ध करून दिले जाणार असून हा निर्णय पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
थंड पाण्याची सोय तर अनेक ठिकाणी केली जाते, मात्र ग्रामपंचायतीतर्फे गरम पाण्याची सुविधा देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने कळमन्यातील नागरिकांमध्ये कुतूहल व आनंदाचे वातावरण आहे. “गाव स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरणपूरक स्मार्ट बनविण्याचा आमचा प्रयत्न असून ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देणे हेच माझे ध्येय आहे,” असे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात पती-पत्नींमध्ये आंघोळीच्या पाण्याची पारंपरिक सोय घरात होत असते, मात्र कळमन्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतच मोफत गरम पाणी उपलब्ध करून देत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाची लाट आहे.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह पोलीस पाटील बाळकृष्ण पाटील पिंगे, ग्रामसेविका शुभांगी कवलकर, सदस्य दीपक झाडे, साईनाथ पिपळशेडे, सुनीता उमाटे, रंजना पिंगे, मुख्याध्यापिका बेबीनंदा पुणेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी महादेव ताजने, कार्यकर्ते सुरेश गौरकार, महादेव आबिलकर, मारोती बल्की, देवराव वांढरे यश ताजणे, साईनाथ निमकर, संगीता उमाटे, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, श्रावण गेडाम, वनिता गौखरे,, लता क्षिरसागर, शांता निकोडे, रामकिशन वाढई, विनोद बल्की, सुनिल मेश्राम, विशाल नागोसे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.