अंमली पदार्थांची नियमित तपासणी करावी : जिल्हाधिकारी आशिष येरेकर

13

अंमली पदार्थांची नियमित तपासणी करावी : जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो ९८६००२००१६

अमरावती : – अंमली पदार्थांचे सेवन ही युवकांमधील भीषण समस्या आहे. यावर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. प्रामुख्याने अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या आहारी जावू नये, यासाठी यंत्रणांनी विक्री होत असलेली ठिकाणे शोधून अंमली पदार्थांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अंमली पदार्थाच्या अनुषंगाने बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, प्रामुख्याने शाळा परिसरात अंमली पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. या परिसरात गांजा, एमडी ड्रग विक्रीवर लक्ष ठेवण्यात यावे, अशी सुचना केली. मेडीकलमधील औषधांची नियमित तपासणी करावी. प्रतिबंध असलेली औषधे विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करावी. बंद असलेल्या कारखान्यांमध्ये ड्रग तयार केला जात नसल्याची याठिकाणी भेट देऊन खातरजमा करावी.

गांजा आणि ड्रग विक्री होत असलेली ठिकाणी शोधून याठिकाणी कारवाई करण्यात यावी. तसेच अंमली पदार्थ सेवन केलेले रूग्णालयात दाखल होत असल्याने रूग्णालयांना सूचना देण्यात याव्यात.

व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी संपर्क केला असल्यास त्यांची माहिती घेण्यात यावी. व्यसनमुक्तीसाठी केंद्रांच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करावी. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन वर्ग ठेवण्यात यावे. तसेच युवकांमध्ये जनजागृती होण्यासाठी शपथ घेण्याचे कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केल्या.