सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार

34

सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार

एक दिवस सेवा बंद आंदोलन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या रुग्णसेवेवर अन्याय करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात गुरूवारी ( दि.18) डॉक्टरांनी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवस सेवा बंदचा नारा दिला. संघटना संपावर गेल्याने रायगड जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडला होता.

सीसीएमपी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील डॉक्टरांनी दंड थोपटले. आयएमएने 18 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या संपामध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयातील एमएसआरडीए या डॉक्टरांच्या संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डने सुद्धा या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

कायद्यानुसार राज्य सरकारचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे. या दोन्ही व्यवसायासाठीचे शिक्षण, प्रवेश परीक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे समान दर्जा देणे चुकीचे असून त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.
मात्र, रुग्णसेवा फारशी बाधित होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास त्याविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर विनायक पाटील यांनी दिली.

नॅशनल मेडिकल कौन्सिल व राज्य वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य इंटर्नशिप करावी लागते. मात्र, ग्रामीण सेवेसाठी दोन वर्षांची नियुक्ती ही अव्यवहार्य ठरत असून, त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवर आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक ताण वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करण्याऐवजी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक पर्यायही आयएमएने मांडले आहेत. त्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देणे, ग्रामीण सेवेसाठी आकर्षक योजना राबवणे, टेलिमेडिसिन, मोबाईल मेडिकल युनिट्स व डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. ‘पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आरोग्यसेवेत काम करण्याची संधी द्यावी. अन्यथा ग्रामीण रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होईल,’ असेही आयएमए अलिबाग शाखेने स्पष्ट केले आहे.

सीसीएमपी नावाचा कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. हा एक वर्षाचा कोर्स करून त्या डॉक्टरांना अलिओपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. या दोन निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील अलिओपॅथी डॉक्टरांनी एक दिवस बंद आंदोलन केले आहे. या बंदच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेण्यात आली आहे.

डॉ. विनायक पाटील