Home latest News बोरशेती पेसा ग्रामपंचायतीत रास्त धान्य दुकानावरून ग्रामस्थांचा गोंधळ
बोरशेती पेसा ग्रामपंचायतीत रास्त धान्य दुकानावरून ग्रामस्थांचा गोंधळ
दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा निर्णय
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
पालघर :- पालघर तालुक्यातील बोरशेती पेसा ग्रामपंचायत परिसरात रेशन दुकानाच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या गावात यापूर्वी रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने विशेष ठरावही मंजूर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा एकदा त्याच व्यक्तीस रेशन दुकानाचा पुरवठा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबर 2025 रोजी बोरशेतीत ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सभेसाठी तब्बल 700 ते 800 ग्रामस्थ उपस्थित राहिले. पुरवठा विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी एकमुखाने आवाज उठवत पद्माकर गजानन सुर्वे यांना कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवण्याची परवानगी देऊ नये, अशी ठाम मागणी केली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश भूतखडे, ग्रामसेविका दिपीका पाटील,ग्रामपंचायत सदस्य, पेसा समिती अध्यक्ष, माजी सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत या वादग्रस्त विषयावर सविस्तर चर्चा झाली. शेवटी ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठाम विरोध लक्षात घेऊन पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला. त्यानुसार, सध्या नियुक्त करण्यात आलेल्या दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांचा परवाना रद्द करण्यात येईल आणि त्याबाबत लवकरच अधिकृत जाहिरनामा काढण्यात येईल. त्यानंतर नियमाप्रमाणे जाहिरनाम्यात ज्याचे नाव पुढे येईल, त्या पात्र व्यक्तीस नवीन रेशन दुकानाचा परवाना देण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
या निर्णयानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. एकाच आवाजात गावकऱ्यांनी दिलेला ठाम संदेश आणि लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय हा बोरशेती ग्रामपंचायतीसाठी महत्वाचा ठरला आहे. ग्रामसभा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा असल्याचे यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले.