आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकून ‘विराट’ पराक्रम करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार कोहली याचं सर्वत्र कौतुक होत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याच्यावर ‘शब्द’सुमने उधळली आहेत. विराटच्या कौतुकासाठी शब्द कमी पडले आहेत. त्याचं आणखी कौतुक करण्यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीची नवी आवृत्ती घ्यावी लागेल. विराटबद्दल लिहिण्यासाठी तुम्हालाही डिक्शनरी घ्यावी लागेल, असं शास्त्री माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं सलग दोन कसोटी सामने गमावले. मात्र, तिसऱ्या लढतीत जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर वन डे मालिका जिंकून इतिहास रचला. विराटनं या मालिकेत तीन शतके आणि १ अर्धशतक ठोकले. त्याचं कुशल नेतृत्व आणि फलंदाजीचं कौतुक होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्रीही ‘निःशब्द’ झाले आहेत. विराटच्या कौतुकासाठी मला ऑक्सफर्ड डिक्शनरीची नवी आवृत्ती घ्यावी लागेल. सगळीच विशेषणं कमी पडतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांनाही सल्ला दिला. त्याच्याबद्दल लिखाण करण्यासाठी नवीन शब्द शोधावे लागतील. तुमच्या जागी मी असतो तर दुसऱ्या दिवशी मी बुक स्टॉलवर नवीन डिक्शनरी विकत घेताना दिसलो असतो, असंही शास्त्री म्हणाले. विराट हा सध्यातरी जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. या विजयाचं श्रेय विराटला जातं, असंही शास्त्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here