Home latest News मेंढ्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड, १ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल...
मेंढ्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड, १ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मेंढ्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांवर रायगड पोलीसांनी धाड टाकली आहे. या प्रकरणी ७५ जणांना अटक करण्यात आली असून १ कोटी ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गोंदाव गावचे हद्दीत असलेल्या टायगर गोट फार्म हाउसममध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळविला जात असल्याची खात्रीशीर माहिती पाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी हेमलता शेरकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून छापा टाकण्यासाठी परवानगी घेतली. त्यानंतर दोन पंच घेऊन या फार्महाऊसवर रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास धाड टाकण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे पोलीस उपविनरीक्षक लिंगाप्पा सरगर हे देखील त्यांचे पथक घेऊन कारवाईत सहभागी झाले. यावेळी ७५ जण मेढ्यांच्या झुजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ३७ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यात झुंजीसाठी वापरण्यात आलेल्या मेंढ्यांचाही समावेश आहे.
यानंतर सर्व ७५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून इम्रान कुरेशी रा. कलिना, कुर्ला, आणि आतिक शेख रा. पुणे या दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात ७७ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम ४,५,१२ (ब) (क) व प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१) (एम) (एन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास एस. एम. निकम पोलीस उपनिरीक्षक पाली पोलीस ठाणे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, पोलीस उपनिरीक्षक एस. एम. निकम,पोलीस उप निरीक्षक लिंगाप्पा सरगर, पोलीस हवालदार म्हात्रे, पाटील, पोलीस शिपाई भपकर,कांबळे, गोरे, लांबखडे यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
दरम्यान प्राण्यांचा वापर करुन त्यांना कुरतेने वागवून आर्थिक फायद्याकरता प्राण्यांच्या झुंजी लावुन त्यावर पैसे लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य करणा-यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी दिला आहे. कोणी अशा प्रकारचे कृत्य करीत असल्यास त्याची माहिती अलिबाग येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाला अथवा स्थानिक पोलीसांना द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. पोलीस हेल्प लाईन डायल ११२ वर तक्रारी नोंदवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.