सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी स्पर्धा: रोहा संघ अंतिम विजेता

23

सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी स्पर्धा: रोहा संघ अंतिम विजेता

अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर रंगला थरार

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने साखळी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील अंतिम लढत रोहा आणि मुरूड संघात झाली. रोहा संघाने मुरूड संघावर मात करीत विजेत्या पदावर नाव कोरले. हा संघ अंतिम विजेता ठरला. या संघाला 51 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. रविवारी सायंकाळी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर कबड्डीचा थरार रंगला. या स्पर्धेचा आनंद हजारो क्रीडाप्रेमींनी तसेच पर्यटकांनी लुटला.

सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्याविरोधात पावले उचलण्यासाठी रायगड पोलीसांनी एक नाविन्य उपक्रम हाती घेतला. मच्छीमार, सुरक्षा दल यांच्यासमवेत समन्वय राखण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत कायम संवाद साधण्यासाठी कबड्डी साखळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सागरी सुरक्षा चषक कबड्डी साखळी स्पर्धा घेण्यात आली. या संघात 16 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा शुभारंभ मांडवा बंदरावर झाला. त्यानंतर मुरूड, रेवदंडा, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेची उपउपांत्य फेरी शनिवारी सायंकाळी अलिबाग समुद्रकिनारी झाली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. त्यातून नागोठणे, पोयनाड, रोहा, मुरूड या चार संघाची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. रविवारी सायंकाळी उपांत्य फेरीला सुरुवात झाली.

पहिली उपांत्य फेरीचा सामना पद्मदूर्ग मूरूड आणि नागोठणे फायटर बुल्स या संघात झाला. नागोठणे संघाने 21 आणि मुरूड संघाने 31 गुण मिळवून मुरूड संघाने दहा गुणांनी विजयाची सलामी दिली. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये मुरूड संघ विजेता ठरला. या संघाची अंतिम सामन्यासाठी निवड झाली.

दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना रोहा फायटर्स आणि किंग्ज ऑफ पोयनाड या संघात झाला. रोहा संघाने 36 गुण मिळवून विजय संपादन केले.

तिसऱ्या उपांत्य फेरीचा सामना नागोठणे आणि पोयनाड संघात झाला. यामध्ये नागोठणे संघाने 20 आणि पोयनाड संघाने 24 गुण मिळविले. ही स्पर्धा अटीतटीची झाली. अखेर पोयनाड संघ विजयी झाला. अंतिम सामना रोहा व मुरूड संघात झाला. रोहा संघाने आघाडी घेत विजय आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत अटीतटीची झाली. अखेर रोहा संघाने मुरूड संघावर मात करीत अंतिम विजेतेपद पटकावले.

रोहा या अंतिम विजेत्या संघाला रोख 51 हजार रुपये व चषक, मुरूड या संघाला द्वीतीय क्रमांकाचे 31 हजार रुपये व चषक, पोयनाड संघाला तृतीय क्रमांकाचे रोख 21 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून रोशन मढवी, उत्कृष्ट चढाई म्हणून अनिरुध्द भोसले आणि उत्कृष्ट पक्कड म्हणून अतिश मोरे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी,रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले,अँड.आस्वाद पाटील , संजय पाटील,अँड.महेश मोहिते,अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या हस्ते विजेत्या संघाचा आणि उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, पोयनाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, मच्छिमार, सागरी सुरक्षा दल, नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन विश्वनाथ पाटील आणि संजय पोईलकर यांनी केले.

महिलांमध्ये मांडवा संघ विजेता
जिल्ह्यामध्ये 12 सप्टेंबरपासून साखळी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महिला संघानेदेखील सहभाग घेतला. अंतिम सामन्यात मांडवा संघ विजेता ठरला. दिघी सागरी संघाने द्वीतीय क्रमांक मिळविले असून पेण संघाने तृतीय क्रमांक मिळवून चषकांवर शिक्का मोर्तब केला.
तसेच उत्कृष्ट पक्कड म्हणून चैताली म्हात्रे यांना गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते या संघाचा व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.