नवरात्रौत्‍सवामुळे बाजारात झेंडूची मोठी आवक

25

नवरात्रौत्‍सवामुळे बाजारात झेंडूची मोठी आवक

उत्‍पादन घटल्‍याने भाव वधारला

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:- गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्र उत्‍सवामुळे झेंडूच्‍या फुलांना मोठी मागणी आहे. त्‍यामुळे बाजारात झेंडूची आवक वाढली आहे. गणेशोत्‍सवानंतर घसरलेले फुलांचे दरदेखील वाढल्‍याचे पहायला मिळत आहेत.

गणेशोत्‍सवात आरास आणि सजावटीसाठी झेंडूच्‍या फुलांना मोठी मागणी होती. चांगल्‍या प्रतीचा झेंडू प्रतिकिलो 200 रूपये दराने विकला जात होता. त्‍यानंतर पितृपंधरवडयात झेंडूच्या फुलांची मागणी घटली होती त्‍यासोबत दरदेखील खाली आले होते. आता पुन्‍हा फुलबाजारात झेंडुची चलती सुरू झाली आहे. सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाले आहे. यावेळी पूजा अर्चा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे.दरवर्षी नवरात्रौत्‍सवासाठी फुलांच्या मागणीचा विचार करून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. या वर्षी पावसाचा मुक्काम लांबल्याने झेंडूच्या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी फुले पावसामुळे कुजून गेली आहेत. त्‍यामुळे झेंडूचा भाव वधारला आहे. प्रतिवर्षी 120 ते 150 रुपये किलोने मिळणारा झेंडू यावर्षी 200 रुपये पार झाल्याने भाविककांमध्‍ये नाराजी आहे. मात्र पूजेसाठी आवश्यक असणारी फुले कमी प्रमाणात का होईना ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.

अलिबागच्‍या मुख्य बाजारपेठेत झेंडूची फुले फुलांच्या खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती. नाशिवंत माल असल्‍याने सणाची संधी साधत शेतकरयांनी मोठया प्रमाणावर झेंडूची काढणी केली आहे. अलिबाग शहरातील बाजारपेठ तसेच रस्‍त्‍याच्‍या कडेला झेंडूच्‍या फुलांचे ढीग पहायला मिळत आहेत.
………………………

पावसाच्या तडाख्याने झेंडूच्‍या शेतीचे नुकसान झालं आहे. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. परीणामी घावूक दर वाढले आहेत . त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला असून सध्‍या 200 रुपये प्रति किलो झेंडू विकला जात आहे.

सुरेश पाटील , -विक्रेता