अनुसूचित *जमातीच्या महिलांसाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

19

अनुसूचित *जमातीच्या महिलांसाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230

चंद्रपूर, दि. 23 :- राज्यातील आदिवासी महिलांचे सामर्थ्य खुलविण्यासाठी त्यांना शिक्षण, आरोग्यसेवा, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये सक्षम बनवून, त्यांना स्त्री सन्मान राखता यावा, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ ही योजना सुरू करण्याबाबत शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाबरोबरच इतर शासकीय विभागांमार्फत वैयक्तिक/ सामुहिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात. अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये लाभार्थी हिस्सा भरण्याकरीता लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर विभागांच्या योजनांचा लाभ आदिवासी महिलांना घेता येत नाही. त्यामुळे अशा योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी तसेच इतर विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी महिलांना मिळावा, व अशा योजनांच्या लाभाव्दारे सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्रवर्ती योजनेमधून लाभार्थ्याने मागणी केल्यास वैयक्तिक योजनेसाठी 50 हजार रुपये व सामुहिक योजनेसाठी 7 लक्ष 50 हजार रुपये या मर्यादेत अटी व शर्तीच्या अधिन राहून शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

इतर विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ अधिकाधिक आदिवासी महिलांना घेता यावा, या उद्देशाने आदिवासी महिलांना व महिला बचत गटांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयमार्फत लाभार्थी हिस्सा देण्यात येणार आहे. त्यामुळे अनुसुचित जमातीच्या महिला लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याकरीता अर्ज कार्यालयास सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.