रायगड जिल्ह्यात नवरात्र उत्सवाची धूम

15

रायगड जिल्ह्यात नवरात्र उत्सवाची धूम

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग – पितृपक्ष संपल्यानंतर सोमवारपासून रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील विविध शहरांत सकाळपासूनच सार्वजनिक दुर्गा मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरवणूक काढून देवीची स्थापना केली.
देवींचे स्थान असलेल्या जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली . देवीची मूर्ती वस्त्रालंकारांनी सजवण्यात आली. विविध फुलांची सजावट करण्यात आली. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी आणि रात्री भजन, पूजन तसेच देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा आहे.
सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दांडिया आणि गरबा रास रंगणार आहे. आदिशक्तीचा उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. त्यामुळे देवीची ओटी भरण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच मंदिरांच्या बाहेर महिलांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
सार्वजनिक मंडळांनी सकाळीच देवीच्या मूर्तीची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली. विविध मंडळांनी महिलांसाठी प्रबोधनात्मक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे संपूर्ण नवरात्र विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पूर्वी केवळ शहरी भागात असलेल्या या उत्सवाचे धूम आता ग्रामीण भागातील पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात 1378 ठिकाणी मूर्ती, तर 192 ठिकाणी देवीच्या फोटोची प्राणप्रिष्ठा करण्यात आली आहे. शिवाय 3527 ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आहे.
*तरुणाईत उत्साह*
नवरात्र उत्सव म्हटले की दांडिया आणि रास गरबा यांची धूम पाहायला मिळते. त्यामुळे तरुणाई मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध मंडळांनी यासाठी विशेष कार्यक्रमाने स्पर्धांचे आयोजन केले आहे. शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातील दांडिया रास चे आयोजन केले जात आहे.
*पावसाचे सावट कायम*
यंदाच्या नवरात्र उत्सवावर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या किरकोळ सरी बरसत आहेत. दिवसभर ऊन – पावसाचा खेळ सुरू आहे. पावसापासून बचावासाठी उत्सव मंडळानी आणि मंडप घातले आहेत. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.