आई जनाई, सोमजाई, कालकाई मातांच्या मंदिराचा ऐतिहासिक ठेवा – मोरगिरी गावात जिर्णोद्धाराची तयारी

79

आई जनाई, सोमजाई, कालकाई मातांच्या मंदिराचा ऐतिहासिक ठेवा – मोरगिरी गावात जिर्णोद्धाराची तयारी

सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ भागात, निसर्गाच्या कुशीत वसलेलं मोरगिरी हे छोटेखानी गाव, केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर आपल्या श्रद्धास्थानी आणि पुरातन मंदिरासाठीही ओळखलं जातं. या गावाची ग्रामदेवता म्हणजे आई जनाई, सोमजाई आणि कालकाई माता – गावकऱ्यांच्या आणि भाविकांच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक.

या मंदिराला इतिहासाची खास किनार लाभलेली आहे. ब्रिटिश कालखंडात, इ.स. 1856 साली राणी विक्टोरिया यांच्या राजवटीत या मंदिरास सनद प्राप्त झाली होती, अशी महत्त्वपूर्ण माहिती मंदिराच्या विश्वस्तांकडून देण्यात आली आहे. पुढे इ.स. 1958 साली मंदिराचे विश्वस्त मंडळ अधिकृतपणे नोंदवण्यात आले असून त्याचा क्रमांक 424(A) कुलाबा रायगड असा आहे.

मंदिराची धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, सध्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी विश्वस्त मंडळाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ व भक्तगण यांच्यासह अनेकांनी या उपक्रमासाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

आई जनाई, सोमजाई आणि कालकाई माता या केवळ गावाच्या रक्षणकर्त्या देवी नाहीत, तर भक्तांच्या संकटाच्या काळात धावून येणाऱ्या, त्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्रद्धास्थानी देवी मानल्या जातात. शारदे नवरात्र उत्सव हा या मंदिराचा प्रमुख सोहळा असून, या काळात बडोदा, मुंबई, ठाणे तसेच रायगड परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

मोरगिरीचं हे मंदिर ही केवळ श्रद्धेची जागा नसून, इतिहास, संस्कृती आणि एकात्मतेचं प्रतीक आहे. मंदिराचा जिर्णोद्धार हा केवळ वास्तूचा नव्हे, तर संपूर्ण गावाच्या अस्मितेचा भाग ठरणार आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.