नागपुर येथील दिक्षाभुमीला जाण्यासाठी तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार का ?

73

नागपुर येथील दिक्षाभुमीला जाण्यासाठी तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार का ?

*अरुणकुमार करंदीकर*
*पनवेल शहर प्रतिनिधी*
*मो. नं. – 7715918136*

पनवेल – नागपुर येथील दिक्षाभुमीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक १४ आॅक्टोबर १९५६ रोजी विजयादशमी दिनी महाराष्ट्र राज्यासह देशभरातील पुर्वाश्रमीच्या लाखो करोडो दलित, शोषित, पिडित, वंचित, उपेक्षित समाज बांधवांसोबत बौध्द धम्माची दिक्षा घेतली होती. तेव्हा पासुन राज्यातीलच नव्हे तर देशातील आणि जगभरातील बौध्द आंबेडकरी समाजाचे अनुयायी लाखोंच्या संख्येने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी नागपुरच्या दिक्षाभुमीवर येत असतात. मागील ६८ वर्षापासुन बौध्द आंबेडकरप्रेमी जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिक्षाभुमीवर सातत्याने येत आहे. धम्मचक्र प्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभुमीच्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बोधिसत्व डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा दिल्यानंतर तळागाळातील लाखो करोडो जनतेने विजयादशमी दिनी धर्मांतराने सीमोल्लंघन केले , तेव्हापासुन बौध्द धम्म दिक्षा दिनाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणुन संबोधण्यात येऊ लागले. त्यास अनुसरून बौध्द आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहेत . बुध्दगया महाबोधी विहार, महु जन्मभुमी, चैत्यभुमी इत्यादी अनेक प्रमुख क्षेत्रासह नागपुरची दिक्षाभुमी बौध्द आंबेडकरी समाजाच्या अस्तित्वाच्या, अस्मितेच्या आणि स्फुर्तीच्या धरोहर आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मागच्या वर्षापासुन मोठ्या प्रमाणात वाजत गाजत मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे. मात्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरच्या दिक्षाभुमीला जाणा-या अनुयायांसाठी अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती महाराष्ट्र शासनाने प्रसारित केलेली नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून तीर्थदर्शन योजनेबाबत जाहिरात अथवा परिपत्रक काढलेले नाही. त्यामुळे बौध्द आंबेडकरी समाजाच्या अनुयायांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही , असा संभ्रम निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातुन दिक्षाभुमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज पर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले असल्याचे अथवा प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे दिसून आलेले नाही.

इतर कोणत्याही समाजाला सणासुदीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन पुढाकार घेऊन जेवढ्या तत्परतेने उपरोक्त योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी धन्यता मानत आहे. त्याउलट नागपुरात जाणा-या बौध्द आंबेडकरी अनुयायांसाठी लाभ योजना सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली नाही. म्हणुनच महायुतीचे महाराष्ट्र शासन आंबेडकर प्रेमी जनतेला सदर योजनेचा लाभ न देण्यासाठी डावलत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने बौध्द आंबेडकरी समाजात शंका कुशंकाचे व अफवांचे पेव फुटले आहे . महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत नागपुरची दिक्षाभुमीही समाविष्ट केलेली आहे. तरीसुद्धा बौध्द आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलेले आहे. यावरून महाराष्ट्र शासन त्यांच्या सोबत भेदभाव करुन सापत्न वागणुक देत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे . याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे बौध्द आंबेडकरी समाजात नाराजी व असंतोष पसरला आहे. इतरांसाठी पायघड्या घालणारे महायुतीचे महाराष्ट्र शासन बौध्द आंबेडकरी समाजाला आता तरी नागपुरच्या दिक्षाभुमीला जाणा-या तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळवून देणार आहेत का ?

नागपुरच्या दिक्षाभुमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी आता फक्त थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ आदेश निर्गमित करून बौध्द आंबेडकरी समाजाला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलावीत. कोणत्याही योजना जाहीर केल्यानंतर नागरिकांना त्यासंबंधी आॅनलाईन अर्ज करायला सांगुन गप्प बसणे हे कशाचे लक्षण आहे ? कोणत्याही योजना जाहीर केल्यानंतर कार्यान्वित करण्यासाठी राज्यातील प्रत्येक समाज वर्गाला प्रवृत्त करुन सदर योजनांचा यशस्वीपणे लाभ मिळवून देण्यासाठी भरघोस प्रयत्न करणे हे राज्य सरकारचे आद्यकर्तव्य आहे. हेच प्रत्येक समाजाच्या सबलीकरण व सक्षमीकरण आणि सामाजिक अभिसरणाचे अनमोल कार्य आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आता तात्काळ सदर योजनेसंदर्भात आदेश व परिपत्रक निर्गमित करून रेल्वे स्थानके, बस स्थानके, वर्तमान पत्रे आणि समाज माध्यमातून अर्ज सादर करण्याची तारीख तसेच योजनेच्या सवलतीच्या लाभांची माहिती प्रसारित करावी. जेणेकरुन नागपुरच्या दिक्षाभुमीला जाणा-या बौध्द आंबेडकरी समाजातील जनतेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळावा. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्वरित आदेश काढुन बौध्द आंबेडकरी समाजाला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ देण्यात यावा.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशातील शासनाने अंमलात आणलेल्या योजनेप्रमाणेच तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रात गेल्या वर्षी जुलै महिन्यात जाहीर करून अंमलात आणली होती. त्यानंतर सालाबादप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर योजनेस पुन्हा मुदतवाढ देऊन अंमलात आणली आहे. उपरोक्त योजना महाराष्ट्रातील व भारत देशातील तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी मोफत सुरू केलेली आहे. सदर योजनेत महाराष्ट्रातील १६१ व भारत देशातील ८८ तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अटी शर्ती नुसार सदर योजनेत ६० वर्षांवरील महिला व पुरुष पात्र ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे. ह्या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तींना मोफत प्रवास, भोजन व निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते. तीर्थ दर्शन योजनेतील पात्र लाभार्थी व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला पाहिजे. तसेच पात्र लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अशा पात्र महिला व पुरुष लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र लाभार्थी व्यक्तींना यादीतील तीर्थस्थळांपैकी वर्षातुन एकदाच एकाच स्थळाच्या तीर्थयात्रेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींनाच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच प्रमाणे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असलेल्या पात्र महिला व पुरुष लाभार्थ्यांना एक सहाय्यक व्यक्ती आपल्या सोबत घेण्याची मुभा आहे.