Home latest News आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 81 कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल
आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 81 कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल
पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी, घाटकुळला घरकुल योजनेचा लाभ
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर, 25 सप्टेंबर
घर हे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून, त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचं आयुष्य, आशा-अपेक्षा आणि स्वप्न गुंफलेलं असतं. हेच हक्काचं घर आता गरीब कुटुंबांना मिळणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे पोंभुर्णा तालुक्यातील 81 कुटुंबांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळणार असून, त्यांच्या आयुष्यातील मोठं स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारामुळे 81 कुटुंबांचे स्वप्न साकार होणारं आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत, सन 2024-25 करिता घरकुल मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1721 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील 60 लाभार्थी आणि घाटकुळ येथील 21 लाभार्थी असे एकूण 81 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी आजअखेर रु. 378.18 लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरित निधी घरकुल बांधकामाच्या प्रगतीनुसार आणि उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार दिला जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
या लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु. 1.30 लक्षप्रमाणे रुपये 22 कोटी 37 लक्ष 30 हजार आणि 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु. 5,200/-प्रमाणे) रु. 89 लक्ष 49 हजार 200 अशा एकूण रु. 23 कोटी 26 लक्ष 79 हजार 200 इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या निधीपैकी तुर्त रु. 2 कोटी वितरित करण्यात येत असून, उर्वरित निधी योजनेअंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पोंभुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.