Home latest News स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत डहाणू पंचायत समितीत प्रभावी उपक्रम
“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत डहाणू पंचायत समितीत प्रभावी उपक्रम
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत (दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) पंचायत समिती डहाणू येथे “एक दिवस एक घंटा – एक सोबत” हा उपक्रम उत्साहात पार पडला. स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचवून समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन पंचायत समिती डहाणूच्या गटविकास अधिकारी मा. पल्लवी सस्ते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वच्छतेचे महत्व, तिचा दैनंदिन जीवनातील परिणाम तसेच समाजविकासाशी असलेला थेट संबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ परिसर हा आरोग्यदायी व प्रगतशील समाजाचा पाया असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.
यानंतर पंचायत समितीच्या आवारात तसेच कार्यालयीन परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम राबवली. या उपक्रमामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे, तसेच पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती प्रत्येकाची सवय बनली पाहिजे” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. समाजातील प्रत्येक नागरिकाने दररोज किमान एक तास स्वच्छतेसाठी देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
“स्वच्छता ही सेवा” या अभियानामुळे ग्रामविकास व सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेली लोकसहभागाची भावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.