बाईक ऑन रेंट विरोधात रिक्षाचालक आक्रमक; अनधिकृत व्यवसायावर कारवाई करा पोलीसांकडे मागणी…

12

बाईक ऑन रेंट विरोधात रिक्षाचालक आक्रमक; अनधिकृत व्यवसायावर कारवाई करा पोलीसांकडे मागणी…

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग – अलिबाग मध्ये गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना मोटरसायकल भाडेतत्वावर देण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सूरू झाले आहेत. मात्र यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करत अनधिकृतपणे सुरू झालेले बाईक ऑन रेंट व्यवसाय बंद करण्याची रिक्षाचालक संघटनांनी पोलीसांकडे केली आहे.

गोव्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा व्यवसायाला परवानगी दिली असली तरी, राज्यात आजवर याबाबत कुठलेही धोरण अस्तित्वात नव्हते. त्यामुळे बेकायदेशीरपणे बाईक ऑन रेंट व्यवसायाचा अलिबागमध्ये सुळसुळाट झाला होता.

कुठलिही परवानगी नसतांना, काही स्थानिक रहिवाशांकडून तसेच पर्यटन व्यवसायिकांकडून दुचाकी गाड्या येणाऱ्या पर्यटकांना भाडेतत्वावर दिल्या जात होत्या. मात्र यामुळे स्थानिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा येऊ लागल्याने, त्यांनी बाईक ऑन रेंट व्यवसायावर आक्षेप घेतला होता.

राज्याच्या परिवहन विभागाने अलिबाग मध्ये एकाच कुटूंबातील दोन जणांना आता परिवहन विभागाने प्रायोगिक तत्वावर बाईक ऑन रेंटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रिक्षा चालक संघटना या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. शासनाने बाईक ऑन रेंटला दिलेली परवानगी रद्द करावी आणि अनधिकृतपणे चालणाऱ्या बाईक ऑन रेंटवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात रायगड पोलीसांना रिक्षा संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे.

पर्यटन स्थळ असलेल्या अलिबागमध्ये दुचाकी भाड्याने देण्याचा जोरात सुरू आहे. ज्यांना परिवहन विभागाची परवानगी मिळालेली नाही ते देखील हा व्यवसाय चालवत आहेत. रिक्षा चालकांच्या वतीने पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे यापुर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारी नंतर आरटीओने या व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या असल्या तरीही हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. ज्यामुळे ऑटो रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

त्यामुळे शासनाने बाईक ऑन रेंटला मंजूरी देऊ नये, जे लोक अनधिकृतपणे हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेनी दिला आहे.

बाईक ऑन रेंट हा व्यवसाय अनधिकृतपणे चालवला जातो. त्याचा आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने दोन व्यवसायिकांना आता हा व्यवसाय करण्याची परवानगी दिल्याचे समजत आहे. तसे झाल्यास रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे शासनाने बाईक ऑन रेंट ला परवानगी देऊ नये.