रिव्हर राफ्टिंगमुळे पोलादपूरच्या पर्यटनाला मिळणार नवा संकल्प– विकास गोगावले यांचा विश्वास

25

रिव्हर राफ्टिंगमुळे पोलादपूरच्या पर्यटनाला मिळणार नवा संकल्प– विकास गोगावले यांचा विश्वास

नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्सतर्फे साहस पर्यटनाची नवी वाट

सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर :- पोलादपूर. निसर्गसंपन्न पोलादपूर तालुक्यात पर्यटनवाढीसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. तालुक्यातील बाजीरे धरण ते लोहारे दरम्यान रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ २७ सप्टेंबर २०२५ रोजी नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्सच्या वतीने करण्यात आला. याचे उद्घाटन युवा सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे सचिव विकास गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना विकास गोगावले यांनी सांगितले की, “पोलादपूर सारख्या निसर्गरम्य भागात साहसी पर्यटनाला चालना दिल्यास, येथील तरुणांचे होणारे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर रोखता येईल. पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारही निर्माण होतील आणि ‘समृद्ध गाव, समृद्ध खेडे’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकेल.”

रिव्हर राफ्टिंगचा आनंद आता पर्यटकांना बाजीरे धरण ते लोहारे या मार्गावर सुरू झालेल्या रिव्हर राफ्टिंगमुळे आता पर्यटकांना साहसी जलपर्यटनाचा थरार अनुभवता येणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, सावित्री, ढवळी आणि कामथी नद्यांनी वेढलेल्या पोलादपूरला निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान दिले आहे. या भागात असलेले नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले कुडपण, मोरजत धबधबा, तसेच शेलार मामा व सूर्याजी मालुसरे यांची स्मृतीस्थळे ही पर्यटनस्थळे तालुक्याच्या ओळखीचा भाग आहेत.

स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न पोलादपूर तालुक्यातील तरुणांना स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे, गुजरातकडे स्थलांतर करावे लागत होते. मात्र, अशा पर्यटन उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान मंत्री यांच्या माध्यमातून उमरठ व कुडपण पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे. त्याच धर्तीवर आता साहसी पर्यटनालाही चालना मिळत आहे.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर: कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, तहसीलदार कपिल घोरपडे, शहरप्रमुख सुरेश पवार, सोशल मीडिया प्रमुख विजय शेलार, नगराध्यक्ष शिल्पा दरेकर नगरसेवक सिध्देश शेठ, तसेच नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष रामदास कळंबे, प्रसाद साने, विक्रम भिलारे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलादपूरच्या साहसी पर्यटन क्षेत्रात ही नवी भर निश्चितच तालुक्याच्या विकासाचा वेग वाढवणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.