ज्ञानमाता सदन सोसायटी तलासरी तर्फे आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात

14

ज्ञानमाता सदन सोसायटी तलासरी तर्फे आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

तलासरी : ज्ञानमाता सदन सोसायटी तलासरी यांच्या चार हायस्कूल व दोन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, झरी येथे करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरपंचायत तलासरीचे नगराध्यक्ष मान. श्री. सुरेश भोई, नगरसेवक श्री. विलास ठाकरे, ज्ञानमाता संस्थेचे संचालक फा. निलम लोपीस, झरी गावच्या सरपंच श्रीमती मीना ठाकरे, शाळा संचालक फा. सॅबी कोरिया तसेच प्राचार्य सिस्टर बस्तियान फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.
१९ वर्षाखालील मुले व मुली, १७ वर्षाखालील मुले व मुली तसेच १४ वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये सामने रंगले. या स्पर्धेत ज्ञानमाता झरी विद्यालयाने प्रभावी खेळ करत १४ वर्षाखालील मुले व मुली, १७ वर्षाखालील मुले तसेच १९ वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये विजेतेपद पटकावले. तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात वरखंड विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला.
कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ असून शक्ती, चपळता, नियोजन आणि संघभावना यांची खरी कसोटी घेणारा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ विजयाचे महत्त्व नव्हे, तर मैत्री, सौजन्य आणि सहकार्य या मूल्यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना शिकता आले.
विजयी गटातील खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्साहात झालेल्या या कबड्डी स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ लाभले.