Home latest News पोलादपूरमध्ये खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठकीत विकास कामांच्या दिरंगाईबाबत कारवाईचे निर्देश...
पोलादपूरमध्ये खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठकीत विकास कामांच्या दिरंगाईबाबत कारवाईचे निर्देश !
अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर:- रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर तालुक्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक आज कॅप्टन विक्रम राव मोरे हॉल येथे पार पडली.
या बैठकीत तालुक्यात सुरू असलेल्या व प्रलंबित विकास प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कामांचा लेखाजोखा खासदारांसमोर मांडला. यावेळी काही कामं बाबत ग्रामस्थांकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावेळी खा. तटकरे यांनी दिरंगाई झाल्यास कारवाईचे निर्देश दिले आहे
प्रामुख्याने या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, पोलादपूर नगरपंचायत, महसूल विभाग, पंचायत समिती यांच्यासह विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या थकबाकीबाबत चर्चा करताना खा. तटकरे यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत, नागरिकांचे पैसे तात्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले.
खा. तटकरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले की, “कामाच्या दर्जावर कोणतीही तडजोड होणार नाही. नागरिकांच्या तक्रारी आणि आक्षेप असल्यास तात्काळ आणि प्रभावी कारवाई केली जावी.”
कामात झालेल्या दिरंगाईबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवले असून, पुढील दोन ते चार दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच, नागरिकांच्या तक्रारींची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाईचे स्पष्ट संकेतही दिले.
या बैठकीस महाडचे प्रांत अधिकारी पोपट उमासे, तहसीलदार कपिल घोरपडे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, धनंजय देशमुख, सुभाष निकम, निलेश महाडिक, विठोबा पार्टे चंद्रकांत बुवा जाधव अजित खेडेकर, नगरसेवक स्वप्निल भुवड, आशा गायकवाड श्रावणी शहा, विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. येत्या दोन ते तीन महिन्यांत पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.