Home latest News शिर्डीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा; श्री. लक्ष्मण रामदास बाबर यांचा गौरव
शिर्डीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा; श्री. लक्ष्मण रामदास बाबर यांचा गौरव
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
शिर्डी | साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी बी दि चेंज फाउंडेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. साई पालखी निवारा येथे संपन्न झालेल्या या मानाच्या सोहळ्यात राज्यभरातील अनेक गुणी, कार्यक्षम आणि समाजासाठी आदर्श ठरलेल्या शिक्षकांचा शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
समाजातील भावी पिढीला घडविणारे शिल्पकार म्हणजे शिक्षक. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून सामाजिक जाणिवा, नैतिक मूल्ये आणि जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. हाच सन्मान दरवर्षी शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने बी दि चेंज फाउंडेशन तर्फे या पुरस्काराचे आयोजन केले जाते.
यंदाच्या सोहळ्यात सन्माननीय श्री. विठ्ठलराव जपे, श्री. स्वरूप कापे, श्री. निखिल वामन व श्री. दीपक चव्हाण आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व विश्वस्त श्री. अभिषेक तुपे यांनीही आपली उपस्थिती दर्शवून पुरस्कारार्थींचा गौरव वाढविला.
यावेळी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सुखडआंबा गावचे सुपुत्र आणि सध्या डोंबिवली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. लक्ष्मण रामदास बाबर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, शैक्षणिक वाटचालीत घडवलेले असंख्य आदर्श विद्यार्थी आणि समाजाशी जुळलेली बांधिलकी या सर्वांचा विचार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. बाबर हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक समाजप्रेमी व्यक्ती म्हणूनही परिचित आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांना गडकिल्ले सर करण्याचा छंद असून, आजवर त्यांनी अनेक गडकिल्ल्यांची यशस्वी सरसकट मोहीम केली आहे. त्यांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण आणि साहसवृत्ती विकसित करण्यास हातभार लागतो.
या मानाच्या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची दखल समाजाच्या विविध स्तरातून घेतली जात आहे. पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्यांचे कौतुक होत असून, हा पुरस्कार त्यांच्या भावी कार्याला निश्चितच नवी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.