पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर, भात व चिकू पिकनुकसानीची पाहणी

23

पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

भात व चिकू पिकनुकसानीची पाहणी; “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे”

अरविंद बेंडगा

जिल्हा प्रतिनिधी, पालघर

मो: 7798185755

तलासरी :- अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात पिक कापणीसाठी तयार असतानाच झालेल्या मुसळधार पावसाने पिक आडवे पडून मोड आले आहेत. या पार्श्वभूमीवर वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी थेट शेताच्या बांधावर उतरून भात व चिकू पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, तसेच स्थानिक तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री नाईक यांनी पोखरण येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जामशेत येथील स्नेहल पोद्दार यांच्या चिकू बागेची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या फुलगळ व फळगळ नुकसानीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत म्हटले की,शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल

यानंतर त्यांनी तलासरी तालुक्यातील वडवली-ओझरपाडा येथील पूरग्रस्त भागाचीही पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि आपदग्रस्तांना शासकीय मदत मिळण्याचे आश्वासन दिले.

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.