वर्धा जिल्हात रेती आणी गौण खनीजाची अवैध तस्करी, रस्त्याची लावली वाट.
वर्धा :- आज वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर रेती आणी गौण खनीजाची अवैध वाहतुक सुरु आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. आज वर्धा जिल्हातील हिंगणघाट, देवळी, फुलगाव, आर्वी, सेलू, सिन्दी, आष्ठी तालूक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी सुरु असुन जिल्हा प्रशासन बघाची भुमीका घेत आहे.
देवळी तालूक्यात तर वाळूसह गौण खनिजांच्या बेफाम वाहतुकीमुळे मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहे. यामुळे नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी सर्वस्तरातून करण्यात आल्या पण त्याची दखल घेण्यात आली नाही. तालुक्याला वर्धा, यशोदा नदी व नाले मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे वाळू तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात रस्ते दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी आला नसल्याने सात वर्षापासून कोणतीच दुुरुस्ती झालेली नाही.
शिरपूर कोटेश्वर रस्ता वाळू वाहतुकीने खराब झाला. त्यामुळे भाविकांना दर्शनाकरिता व दशक्रिया कार्यक्रमाकरिता जाणे-येणे प्रवास करणे कठीण झाले आहे. देवळी-दिघी बोपापूर सरुळ हा रस्ता वर्धा कापसी राळेगाव शिरपूर-कोटेश्वर मुख्य रस्त्याला जोडणार आहे. पण यशोदा नदीवरील पूल वाहतुकीस योग्य नसल्याने बसवाहतूक बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना शेतमाल बाजार पेठेत आणणे त्रासदायक झाले आहे.
देवळी-सोनेगाव हा रस्ता बिडकॉन कंपनीने मुरमाची वाहतूक करून खराब केला. दुरुस्तीचे आश्वासन दिले होते पण काहीच झाले नाही. हा रस्ता सोनेगाव-नागझरी-आगरगाव आणि पुलगाव जाण्याकरिता कमी अंतराचा आहे. देवळी-नांदोरा मुदगाव-आकोली पळसगाव आगरगाव फत्तेपूर या गावाला जाण्यायेण्याकरिता हा रस्ता महत्वाचा आहे.
शोदा नदीवरील पूल आणि रस्ता जागोजागी खड्डे पडल्याने खराब झाला आहे. विजयगोपाल तांबा हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. शिरपूर, बोपापूर गणेशपूर-अंदोरी हा रस्ता शिरपूरवरून अंदोरी-आंजी जाण्याकरिता जवळचा रस्ता आहे. अंदोरीवरून राळेगावलासुध्दा जाता येते. त्यामुळे महत्त्वाचा रस्ता समजण्यात येतो. हा रस्तासुद्धा वाळू वाहतुकीने अतिशय खराब झाला आहे.
रस्ते दुरुस्तीवर जिल्हा परिषदेने कोणताच निधी आतापर्यंत देण्यात आला नाही. या रस्त्याने दररोज शंभर ते 150 ट्रॅक्टर टिप्पर वाळूची वाहतूक करतात. जास्त प्रमाणात वाळू भरून वाहतूक करत असल्याने रस्ते रस्ते नाही पांदणरस्ते झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.