झरी ग्रामपंचायतीत पोषण माह 2025 अंतर्गत बालक-पालक मेळावा उत्साहात पार पडला
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
तलासरी :- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प – तलासरी अंतर्गत बीट वसा-1 मधील झरी ग्रामपंचायत येथे पोषण माह 2025 निमित्ताने बालक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला स्थानिक महिला, माता, अंगणवाडी व आशा सेविका यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सरपंच श्रीमती मीना ठाकरे उपस्थित होत्या. तसेच पर्यवेक्षिका श्रीमती गीता शैलश गोंधळेकर, प्रथम संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती मनिषा मॅडम आणि रेखा मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका उपस्थित होत्या.
मेळाव्याची सुरुवात पोषण प्रतिज्ञेने करण्यात आली. त्यानंतर आहार प्रात्यक्षिक, पूर्व-शालेय शिक्षण साहित्य मांडणी, आणि बालक-पालक पोषण मेळावा सेल्फ पॉईंट यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मातांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच बालकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि लसीकरणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमात मातांनी मनोरंजनासाठी पारंपरिक नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगतदार स्वरूप दिले. उपस्थित मान्यवरांनी पोषणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आणि प्रत्येक बालक कुपोषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यामुळे ग्रामपातळीवर महिलांमध्ये आणि पालकांमध्ये पोषण, आरोग्य आणि बालसंगोपनाविषयी जागरूकता वाढीस लागली असून, “सुपोषित बालक, निरोगी भारत” ही संकल्पना साकार करण्यास हातभार लागणार आहे.