प्रबोधनकारांचे पुस्तक फेकुन अवमान करणाऱ्या
महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रबोधनकार ठाकरे व आंबेडकर प्रेमी जनतेची मागणी.
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. क्र. 7715918136
पनवेल – बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविका, परिसेविका , परिचारिका व अन्य महिला कर्मचाऱ्यांनी बहुजनवादी विचारवंत, विद्रोही इतिहासकार आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक फेकुन प्रबोधनकारांच्या पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा घोर अवमान केलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की , रुग्णालयात कक्ष सहाय्यक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी राजेंद्र कदम यांनी सेवा निवृत्ती निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात कदम यांनी रुग्णालयातील सहका-यांना भेट म्हणून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘ देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे ‘ व सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचे ‘ देशाचे दुश्मन ‘ ह्या समाज प्रबोधनात्मक पुस्तकांचे वितरण केले होते. परंतु काही महिला कर्मचाऱ्यांनी यावरुन मोठा वाद निर्माण केला आहे.
सदर दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर रुग्णालयातील कर्तव्यावरील सहाय्यक अधिसेविका श्रीम. माया गिरी व परिचारिका श्रीजा सावंत, ईश्वरी दुरांबे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तेव्हा त्यांना राग अनावर झाला म्हणून अन्य महिला कर्मचाऱ्यांना ह्याबद्दल भडकावून त्यांनाही आपल्या सोबत घेतले. अशा प्रकारे परस्पर संगनमताने कट कारस्थान रचुन सहाय्यक अधिसेविकेने कदम यांना आपल्या कक्षात बोलावले. ह्या पुस्तकांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पुस्तके तुम्ही रुग्णालयात का वाटली? असे अनेक प्रश्न करुन कदम यांना जाब विचारला. सार्वजनिक कार्य स्थळी आक्रमकपणे कांगावा करून प्रश्नांची सरबत्ती करणा-या महिला कर्मचाऱ्यांनी कदम यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही. तसेच ह्या प्रसंगी सदर महिला कर्मचारी थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या बद्दल गरळ ओकत होत्या . ‘ प्रबोधनकार ठाकरे हे पुस्तक आम्हाला द्यायला आले होते का ? प्रबोधनकार ठाकरे यांनी ह्या पुस्तकात हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेले आहे. अशा पुस्तकाला आम्ही हातही लावणार नाही.’ अशी मुक्ताफळे उधळून सदर महिला कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा घोर अवमान केलेला आहे. यावेळी सहाय्यक अधिसेविका व अन्य महिला कर्मचाऱ्यांनी गदारोळ करुन कदम यांना सार्वजनिक ठिकाणी जाहिरपणे माफी मागायला भाग पाडले. तेव्हा सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी कदम यांनी सर्वांसमक्ष हात जोडून माफी मागितली. मात्र त्यानंतरही महिला कर्मचाऱ्यांनी कदम यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे पुस्तक फेकुन टाकले. ह्या संपुर्ण घटनाक्रमाचे मोबाईल फोनद्वारे चित्रण करुन त्याची चित्रफीत सर्वच महिला कर्मचाऱ्यांनी सगळीकडे सामाईक केली आहे. वरील सर्व प्रकारामुळे महापालिकेत वातावरण तापले आहे.
वास्तविक पाहता सार्वजनिक कार्यस्थळी धार्मिक वाद निर्माण करणे अत्यंत घृणास्पद आहे. सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या धर्माचे अवडंबर माजवु नये. परंतु कस्तुरबा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे निमित्त पुढे केल्याचे दिसून येते आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेने विभाग कार्यालयात आणि रुग्णालयासह इतर सर्वच कामाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यास 2016 मध्ये बंदी घातलेली आहे. तरीसुध्दा महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम साजरा केले जातात. अशा कार्यक्रमात सार्वजनिक कार्यस्थळी पुरुष कर्मचारी दारुच्या पार्ट्या करतात तसेच महिला कर्मचारी नाच गाण्याचा कार्यक्रम करत असतात . असे ओंगळवाणे हिडीस प्रकार अनेक वेळा जनतेच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहेत.
राजेंद्र कदम यांनी यापैकी आक्षेपार्ह असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहका-यांना भेट स्वरूपात राष्ट्रपुरुषांच्या समाज प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप केले. यात गैर असे काहीही नाही. फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने होत आले आहे. समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असुन पुस्तक लिहिणे, वितरित करणे, चर्चासत्र आयोजित करणे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम आयोजित करणे हा त्याचाच एक भाग आहे.
रुग्णालयातील सदर घटना क्रमाबाबत कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने याबाबत महिला कर्मचाऱ्यांवर काहीच कारवाई केली नाही. म्हणून शेवटी कदम यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रबोधनकार ठाकरे यांचा तिरस्कार करुन आणि त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून घोर अवमान करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांविरुध्द प्रबोधनकार ठाकरे व आंबेडकर प्रेमी जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्याच प्रमाणे राजेंद्र कदम यांना सार्वजनिक कार्यस्थळी अपमानित केले आहे. हा त्यांचा अपमान नसुन प्रबोधनकार ठाकरें सारख्या थोर महापुरुषांचा अपमान आहे. वरील दोन्ही निंदनीय प्रकाराबद्दल कामगार संघटनांनी राजेंद्र कदम यांच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी प्रबोधनकार ठाकरे समर्थक व आंबेडकर प्रेमी जनतेने केली आहे.