ग्रामपंचायत बोर्ली हद्दीतील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचा हंडा मोर्चा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली हद्दीतील बोर्ली गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदी–नाल्यांमधून उन्हाच्या तापात पाणी आणावे लागत आहे. यामुळे विशेषतः महिलांवर मोठा मानसिक व शारीरिक ताण येत आहे.
या गंभीर परिस्थितीचा निषेध म्हणून आज बोर्ली गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय, बोरली येथे एकत्र येत हंडा मोर्चा काढला. मात्र, या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक दोघेही कार्यालयात अनुपस्थित होते. सरपंचांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष भेटण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी गावाकरिता राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच विविध योजनांतून लाखो रुपयांचा निधी प्राप्त होत असतो, मात्र हा निधी फक्त कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याने ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि निधीचा अपुरा वापर हा ग्रामस्थांच्या समस्यांचा मूळ कारण ठरत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी व संबंधित निधीच्या वापराबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.