ज्ञानमाता विद्यालय, झरीच्या कबड्डीपटूंचा जिल्हा पातळीवरील डंका!
पालघर तालुक्यावरील मात, विभागीय स्पर्धेसाठी सज्ज संघ
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
7798185755
सफाळे :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, सफाळे येथे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय, झरी (ता. तलासरी, जि. पालघर) येथील कबड्डी संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने पालघर तालुक्याच्या बलाढ्य संघावर मात करत विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळ करत, संघाने उत्कृष्ट बचाव आणि चढायांचा जबरदस्त मेळ साधत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. त्यांच्या या यशामुळे आता हा संघ विभागीय स्तरावर पालघर ग्रामीण संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे, ही बाब संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची आहे.
दरम्यान, विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघानेही तितक्याच दमदार लढतीत उपविजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात चुरशीची व रोमहर्षक झुंज देत संघाने जरी थोडक्यात पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकली. संघातील सर्व खेळाडूंनी संघभावना, शिस्त आणि चिकाटीचे दर्शन घडवले.
विद्यालयाच्या या दुहेरी यशाबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्पाधिकारी विशाल खत्री (भा.प्र.से), ज्ञानमाता सदन संस्थेचे संचालक फा. निलम लोपीस तसेच विद्यालयाचे प्राचार्य सि. बस्तियान फर्नांडिस यांनी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
झरी येथील या ग्रामीण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने संपूर्ण जिल्ह्यात झरीचा झेंडा उंचावला असून, विभागीय स्तरावरही तेच यश पुन्हा मिळवतील, अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.