वेतन फरकातील घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या.
अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल होणार गुन्हा.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणातील आरोपी ज्योतीराम पांडुरंग वरुडे यांचा जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे विष प्राशन करुन मृत्यू झाला असून त्यांना दि. १२ ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे. या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (वय ४७) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस तपास सुरू आहे.
ज्योतीराम वरुडे हे गाजलेल्या जिल्हा परिषद वेतन फरक घोटाळ्यातील एक आरोपी होते. त्यांच्या आत्महत्येमुळे या घोटाळ्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. त्यातच वरुडे यांनी मृत्युपुर्व चिट्टी लिहून ठेवली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या चिट्टीमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला आहे.
मागील आठ महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक किशोर साळे या प्रकरणाचा तपास करीत होते. वरुडे यांची बदली काही महिन्यांपुर्वीच अलिबाग येथून माणगाव पंचायत समिती येथे झाली होती. माणगाव येथे रहात असतानाच त्यांनी १२ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांनी विषप्राशन केल्याची माहिती दिली आहे. रायगड जिल्हयामध्ये या तपासावर राजकीय दडपण येण्याची शक्यता असल्याने घोटाळयाचा तपास मुंबई किंवा नवी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेशण शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश करावेत अशी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावत यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 16 मार्च 2025 रोजी पत्र पाठवून केली होती. या प्रकरणात फक्त वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यांत आली आहे. त्या त्या विभागाचे आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना शासकीय निधी काढण्यासंदर्भात सेवार्थ या प्रणालीमध्ये संपूर्ण अधिकार असतो त्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) अधिका-यांचीही चौकषी पोलीसांकडून करण्याची मागणी केली होती. वरुडे यांच्या आत्महत्येमुळे सावंत यांनी पुन्हा त्यांनी गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्राची आठवण करुन देऊन यामध्ये आणखी बळी जाण्याअगोदर या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय चौकशी समितीकडून करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
काय होते प्रकरण?
रायगड जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-याने रू.एक कोटी तेवीस लाख रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे तसेच रायगड एकात्मिक बाल विकास विभागातही नाना कोरडे, ज्योतिराम वरुडे व महेश मांडवकर या वेतन देयक तयार करणा-या कर्मचा-यांनी रू. 4 कोटी 12 लाख 34 हजार 771 रुपयांचा अषा प्रकारे एकूण रू. 5 कोटी 35 लाख 34 हजार 771 रूपयांचा अपहार उघडकीस आला होता. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण ज्या त्या विभागाच्या आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) आहेत त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात एफ.आय.आर.क्र.33/2025 गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणांमध्ये बनावट वेतन देयके तयार करून निधीची अफरातफर करण्यात आली. या प्रकरणी क्लार्क नाना कोरडे याला अटक करण्यात आली होती. अलिबाग पोलिसांनी या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती. तसेच या प्रकरणांची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती . रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधींच्या वेतन फरकाच्या घोटाळ्यात जोतिराम पांडुरंग वरुडे आणि महेश गोपीनाथ मांडवकर यांच्यासह इतर अनेक आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळले होते , तर या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते .