कन्हाळगाव पुनर्वसन न झाल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार*

58

*कन्हाळगाव पुनर्वसन न झाल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार*

ग्राम पुनर्वसन समितीची पत्रकार परिषदेत माहिती.

जितेंद्र नागदेवते
*सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- तालुक्यातील कन्हाळगाव ( सामदा) हे आसोला मेंढा तलावाच्या पोटात असलेले गाव असून तलावाचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण झाले असल्याने तलावाचे पाणी गावसभोवताल होऊन जनजीवन विस्कळीत होत असते. तसेच तलावाच्या विस्तारीकरणाने गावातील ८० टक्के शेत जमीन शासनाने अधिग्रहित केली असून उरलेले २० टक्के शेतकऱ्यांसह गावातील नागरिक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याने सतत उपासमारीची पाळी येत आहे. त्यामुळे कन्हाळगाव ग्राम समितीने सदर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी मागील अनेक दिवसापासून मागणी केली आहे. मात्र शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याने कन्हाळगाव वासियानी येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाचा निषेध व्यक्त करीत असल्याची भावना ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले आणि संपूर्ण परिसर जंगल व्याप्त असल्याने मानव वन्यजीव संघर्षाने ग्रासलेले कन्हाळगाव ( सामदा) हे ब्रिटिश काळातील पुनर्वसित गाव आहे. कन्हाळगाव हे असोला मेंढा तलावाच्या पोटात असल्याने येथील शेतजमिनी तलावाच्या पाण्याखाली जाऊन पिकांची पूर्णतः नासाडी होत असते. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केले असल्याने आता या गावात शेतीची मजुरी मिळत नाही . तसेच इथे कोणताही रोजगार उपलब्ध नाही. शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला सुद्धा अत्यंत अल्प असल्याने त्या रकमेत अन्य ठिकाणी जमिनी घेऊ शकत नाही. त्यामुळे आता उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नाही. करिता कन्हाळगाव चे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे. याकरिता राज्यपाल, मुख्यमंत्री, चिमूरचे खासदार, ब्रम्हपुरीचे आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी , यांना वारंवार निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मात्र या मागणीकडे शासनाने पूर्णता दुर्लक्ष केले असल्याने अखेर सर्व कन्हाळगाव वासियानी येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाचा निषेध व्यक्त करीत असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. यावेळी ग्राम पुनर्वसन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच ज्योत्स्ना मडावी, समितीचे सचिव विनोद सिडाम, सदस्य अर्चना तुमराम, वृंदा मस्के, पुंडलिक भैसारे, नेपाल इंदोरकर, मोरेश्वर तुमराम, भाऊराव मेश्राम, विनोद मडावी, इत्यादी उपस्थित होते.