ड्रेनेज समस्यांवर तातडीची कारवाई न झाल्यास 27 तारखेला सिडको कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – ज्ञानेश्वर तुपसुंदर मो. 8668413946
नाशिक – चुंचाळे शिवारातील घरकुल विभागातील वाढत्या ड्रेनेज समस्यांमुळे त्रस्त नागरिकांनी आज सिडको विभागीय कार्यालयात धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाइन तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर वाहणे आणि परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत महापालिकेला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर केला.
नागरिकांनी सांगितले की घरकुल परिसरात ड्रेनेज लाइन पुन्हा पुन्हा तुंबत असल्याने घरे, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सांडपाणी साचते. काही भागात तर सांडपाणी घरांमध्ये आणि जेवणाच्या भांड्यांपर्यंत पोहोचत असल्याचे धक्कादायक वास्तव नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. “आमच्या खाण्याच्या जेवणातही ड्रेनेजचे पाणी पडते, याला जबाबदार कोण?” असा तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला.
यामुळे परिसरात डेंगू, मलेरिया सारख्या आजारांचे सावट वाढत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे महापालिकेने घरकुल विभागातील सभागृहे बंद ठेवल्यामुळे नागरिकांच्या अनेक सोयी-सुविधा ठप्प झाल्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अस्वच्छता आणि असुविधांमुळे रहिवाशांमध्ये संताप वाढत आहे.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या आशा प्रशांत खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात, अक्षय परदेसी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. “अधिकारी कामच करत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, समस्यांचा तातडीने निपटारा न झाल्यास येणाऱ्या 27 तारखेला सिडको विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.
नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत महापालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी ड्रेनेज समस्या, बंद पडलेली सभागृहे, रस्त्यांची दुर्दशा आणि आरोग्याचा गंभीर धोका याबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली.
घरकुल विभागातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. आता प्रशासन तातडीने कार्यवाही करते की नागरिकांचे आंदोलन तीव्र रुप धारण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.