सिनारमास कंपनी पोहोच रस्त्यासाठी स्लॅगचा भराव; स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान

72

सिनारमास कंपनी पोहोच रस्त्यासाठी स्लॅगचा भराव; स्थानिक शेतकऱ्याचे नुकसान

पाण्याला पांढरट, गढूळ रंग; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-धाकटे शहापूर परिसरात एमआयडीने सिनारमास कंपनीपर्यंत पोहोच रस्त्यासाठी भराव केला आहे. हा भराव स्लॅग तसेच माती, मुरूम याचा वापर करून करण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले असून, त्या पद्धतीने अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये सुजित पाटील यांच्या तलावातील मासे मृत झाले असून, तलावातील पाणी पांढरट आणि गढूळ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सीमांकनाच्या नावाखाली सिनारमास कंपनीपर्यंत पोहोच रस्ता तयार करण्याची हालचाल दोन दिवसांपूर्वी सुरु झाली. यावेळी धेरंड, शहापूरमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी, ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तरीदेखील पोलीस बळाचा वापर करीत गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी, स्थानिकांना दाबण्याचा प्रयत्न एमआयडीने सुरु केला आहे.

भूसंपादन अधिनियम 2013 च्या कायद्याप्रमाणे 1 कोटी 92 लाख 37 हजार 803 रुपये प्रतिएकरी मोबदला देण्यात यावा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील तरतुदीप्रमाणे संपादित क्षेत्रास 15 टक्के विकसित भूखंड मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना वारसा हक्काने प्रकल्पामध्ये नोकरीत सामावून घ्यावे, पुनर्वसन कायद्याप्रमाणे फायदे मिळाले पाहिजेत, शेतघरे, शेततळी, गुराढोरांचे गोठे, फळ व सावली देणारी झाडे आहेत, या जागेत मासेमारी करीत आहेत, त्या माध्यमातून स्थानिक शेतकरी पूरक उत्पन्न घेत आहेत. या बाबींचा विचार मूल्यांकन करण्यात यावा, भूमीहीन होणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना शेतकरी दाखला देण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून लढा देत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होत नाही, तोपर्यंत काहीही काम करू नये, अशी विनंतीदेखील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत भरावाचे काम सुरुच करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता भराव करण्यात आल्याची बाब ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर रविवारी दुपारनंतर वन विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या पाहणीत कांदळवनांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातील क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

सिनारमास या प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. माती, मुरूम व स्लॅगचा वापर करण्यात आला आहे. हा स्लॅग एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातर्फे टाकण्यात आला आहे. ठेकेदारामार्फत भरावासाठी गट क्रमांक 264, 265 मधील जागेत स्लॅग टाकण्यात आला आहे. हा स्लॅग सुजित पाटील यांच्या शेतामधील तळ्यामध्ये तसेच तळ्यात किनाऱ्यावर आढळून आला आहे. तळ्यात मासे मृतावस्थेत आढळून आले असून, पाणी पांढरट व गढूळ रंगाचे आढळले असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. पाण्याचा व स्लॅगचा नमुना गोळा करण्यात आला आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

सिनारमास कंपनीपर्यंत पोहोच रस्त्यासाठी एमआयडीसीने स्लॅग व दगड, माती टाकून भराव केला. कांदळवन तोडीबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना धाब्यावर बसवत काम केल्याने कांदळवनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. मात्र, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.17) सकाळी भरावाला पुन्हा सुरुवात केली. या प्रकारामुळे एमआयडीसीचा मनमानी कारभार उघड झाला आहे. पोलीस बळाचा आधार घेत एमआयडीने ग्रामस्थांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

प्रत्यक्ष पाहणी अहवाल करण्यात आला. धेरंड-शहापूर येथील प्रस्तावित सीनारमास प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. माती, मुरुम व स्लॅगचा वापर करण्यात आला आहे. शेतामधील तळ्यामध्ये व किनाऱ्यावर स्लॅग आढळून आला आहे. तळ्यातील मासे, मृतावस्थेत आढळून आले आहेत. पाण्याचा व स्लॅगचा नमुना गोळा करण्यात आला आहे.

-डॉ. गजानन खडकीकर,
क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सिनारमास कंपनीपर्यंत पोहोच रस्त्यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा अद्यापपर्यंत मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही. शेतकरी, स्थानिकांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे रस्त्यासाठी भरावाचे काम सुरु करण्यात आले आहे. कंपनीतील स्लॅगचा भराव करताना शेतकऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे. या भरावामुळे तलावातील मासळी मृत पावली आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देणे आवश्यक आहे. भराव करताना कोणालाच विश्वासात घेतले नाही.

-रुपेश पाटील,
बाधित शेतकरी

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले
गेल्या चार दिवसांपासून धेरंड, शहापूर परिसरातील शेतकरी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत. एमआयडीसीमार्फत भराव केला जात आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देणे टाळले.
पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार
धाकटे शहापूर येथील सुजित पाटील यांचे शहापूर येथील सर्व्हे नंबर 265/2 मध्ये शेतजमीन, शेततळे व राहत घर आहे. या ठिकाणाहून शहापूर-धेरंड औद्योगिक पोहोच रस्ता जात आहे. प्रस्तावित भूसंपादनाखाली नसलेल्या मालकीच्या जागेत एमआयडीसीने बेकायदेशीर भराव केला आहे. या भरावाला विरोध असताना पोलीस बंदोबस्तामध्ये भराव करण्यात आला. त्यात स्लॅगचा वापर करण्यात आला आहे. तो भराव पाटील यांच्या शेततळ्यामध्ये गेला असून, तळ्यातील मासळी मृत पावली आहेत. याप्रकरणी सुजित पाटील यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
कांदळवन तोडीची पाहणी
सिनारमास कंपनीपर्यंत पोहोच रस्ता तयार करण्यासाठी भरावाचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र, भराव करीत असताना कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड झाली. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कांदळवनाची तोड करू नये, अशी सूचना दिली.