कुऱ्हाडीने रक्तरंजित खून; 24 वर्षांनंतर नेरळ पोलिसांनी उघड केला ठावठिकाणा

67

कुऱ्हाडीने रक्तरंजित खून; 24 वर्षांनंतर नेरळ पोलिसांनी उघड केला ठावठिकाणा

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या भावजयीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करून तब्बल 24 वर्षे फरार राहिलेल्या आरोपीला अखेर नेरळ पोलीस ठाणे पथकाने मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 105/2001 भादंवि कलम 302, 504 अन्वये दाखल असलेल्या या खून प्रकरणातील आरोपी संतोष गणपत राणे (वय 49, रा. पोही, ता. कर्जत) याला अटक करण्यात आली.

ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

२ फेब्रुवारी 2001 रोजी सकाळी आरोपी संतोष राणे हा आपल्या पत्नीशी तीव्र वाद घालत होता. फिर्यादी अनिल गणपत राणे यांची आई व नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर तो घराबाहेर गेला; मात्र क्षणार्धात रागाच्या भरात घरातून कुऱ्हाड आणून त्याने भावजयी गुलाब राणे हिच्यावर मानेवर, हातावर व शरीरावर वार करून तिची हत्या केली. त्या वेळी गुलाब राणे नऊ महिन्यांची गर्भवती होती. गुन्ह्यानंतर आरोपी ठिकाणावरून फरार झाला होता.

गेल्या दोन दशकांपासून आरोपीचा मागोवा लागत नसल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडून माहिती घेतली; परंतु त्याचा पत्ता मिळाला नव्हता. नंतर तांत्रिक तपासातून आरोपीने आपले नाव बदलून संतोष गणपत पाटील अशी ओळख तयार करून पिंपरी–चिंचवड येथील सांगवी परिसरात केटरिंगचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले.

20 नोव्हेंबर 2025 रोजी सांगवीतील फेमस चौकात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे, पोलीस शिपाई केकान (१८३६) व बेंद्रे (४६७) यांनी विशेष कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत. नेरळ पोलिसांच्या दक्ष आणि सातत्यपूर्ण तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.