ऑपरेशन फँटासिया’—शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वात नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

77

ऑपरेशन फँटासिया’—शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वात नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- बोरले गावच्या रोडलगत असलेल्या ग्लोब फँटासिया बांधकाम साईटवरून मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड व सिमेंटच्या गोण्या गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, हे प्रकरण गुन्हेगारांसाठी नव्हे तर पोलिसांसाठी आव्हान ठरावे—असे होत नाही! कारण नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखालील तडफदार पथकाने या चोरीचा चक्क ‘ट्रेलर’ही न दाखवता संपूर्ण गुन्हा उघडकीस आणत चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

गु.र. नं. 207/2025 नुसार दाखल झालेल्या या प्रकरणात सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याने तपासाला एक मोठे ‘ब्लाइंड स्पॉट’ निर्माण झाले. पण ढवळे यांनी तेच आव्हान संधीमध्ये रूपांतरित करत त्यांच्या पथकाला स्पष्ट दिशा दिली—“सीसीटीव्ही बंद असला तरी चोरटा अदृश्य होत नाही!”
याच मार्गदर्शनाखाली पोह/2384 वाघमारे, पोशी/1836 केकाण, पोशी/467 बेंद्रे व पोशी/1415 वांगणेकर यांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि अखंड मेहनत यावर आधार घेत संशयितांचा काटेकोर पाठलाग केला.

शेवटी चौकशीत राकेश पारधी, तबारक हुसैन खान, रवींद्र कांबळे आणि अतिश चहाड यांनीच चोरी केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या तपासात पोलिसांनी 30,000 रुपयांचे लोखंडी रॉड, 1,03,600 रुपये किमतीच्या 370 सिमेंट गोण्या आणि चोरीसाठी वापरलेला महिंद्रा पिकअप असा तब्बल ₹3 लाखांचा मुद्देमाल जप्त करून साईट व्यवस्थापनाचा विश्वास परत मिळवला.

या संपूर्ण ऑपरेशनला पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवतारे आणि DYSP राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. मात्र, गुन्हा उकलण्याची धार, वेग आणि अचूक रणनीती—यामुळे शिवाजी ढवळे व त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा नेरळ परिसरात गुन्हेगारांचे नाक खांद्यात घातले आहे.