वाकी येथील ताजुद्दीन बाबांचा वार्षिक उर्स (यात्रा) रद्द.

युवराज मेश्राम प्रतिनिधी
सावनेर:- मागीलवर्षी मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभर कोरोनाने थैमान घातले आहे.दरम्यान संसर्ग वाढू नये म्हणून मार्च 2020 पासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. मधल्या काही महिन्यात परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे पाहून टप्याटप्याने अनलॉक करण्यात आले होते. पण नागपूरच्या ग्रामीण व शहरी भागात पुन्हा अचानक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने शासनाने सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक व इतर कार्यक्रमावर बंदी घातली आहे.
वाकी येथे 78 वर्षांची परंपरा असलेला ताजुद्दीन बाबांचा वार्षिक उर्स (यात्रा) मोठया उत्साहात दरवर्षी 3 मार्च ते 9 मार्च दरम्यान असते. महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील हजारो भक्त यात्रेत दर्शनासाठी येत असते. मधल्या काळात कोरोनाचा जोर कमी दिसल्याने व सगळं सुरळीत असल्याने वाकी येथील ताजुद्दीन बाबा ट्रस्ट ने शासनाकडे यात्रेची परवानगी मागितली होती पण अचानक रुग्ण संख्या वाढल्याने शासनाने दक्षता घेत पुन्हा संसर्ग पसरू नये या हेतूने संपूर्ण ठिकाणी कार्यक्रमावर बंदी घातली आहे. ट्रस्ट ने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून वाकी येथे होणारा ताजुद्दीन बाबांचा वार्षिक उर्स (यात्रा) या वर्षी रद्द करण्यात आली असून भाविकांनी घरीच पूजा-अर्चना करावी. दरबार मध्ये गर्दी करू नये अशी विनंती वाकी दरबार ट्रस्टने केली आहे.