चांदा पब्लिक स्कूल येथे एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन संपन्न
• बालकलाकारांच्या मनमोहक कलाकृतीने वेधले उपस्थितांचे लक्ष
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 26 नोव्हेंबर
चांदा पब्लिक स्कूल येथे एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुर्व प्राथमिक विभागात एकल नृत्य स्पर्धेत चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याने संपूर्ण वातावरण रंगुन गेले होते. प्रत्येक बालकलाराने ताल, लय, सुंदर हालचाली, आकर्षक अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम साधत सर्वांची मन जिंकली.
वर्गनिहाय निवड प्रक्रियेनंतर अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुलांनी अतिशय आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपली कला सादर केली. या स्पर्धेमुळे मुलांमध्ये नृत्याच्या आवडीसोबतच मंचावरील धाडस, अभिव्यक्ती कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याचा उद्देश शिक्षकांना साध्य करणे शक्य झाले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित परिक्षक विजयता पेंदाम व प्रशांत घोडमारे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. लहान चिमुकल्यांनी केलेले नृत्य सादरीकरण व त्यांच्या चेह-यावरील निरागस अभिनय पाहून परीक्षक भारावुन गेले.
शाळेच्या संचालिका स्मिता जिवतोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत प्रत्येक मुलामध्ये दडलेली कला शोधुन त्यांना व्यासपीठ देवून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हीच आमची सततची भूमिका असते, असे वक्तव्य केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी बालकलाकारांना प्रोत्साहन देत म्हटले की प्रत्येक मुलांमध्ये दडलेली कल्पकता आणि त्यांच्या नृत्यातील अभिव्यक्ती यांचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यांना मंचावर आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी त्यांनी सर्व शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले.
पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका अल्फा बोरम यांनी तर आभार शिक्षिका सुषमा बेरड यांनी मानले.