रायगड जिल्हा : दहा नगर परिषदांच्या निवडणुकीत शांतता; चिन्हवाटपाची उत्सुकता शिगेला

41

रायगड जिल्हा : दहा नगर परिषदांच्या निवडणुकीत शांतता; चिन्हवाटपाची उत्सुकता शिगेला

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाने, कोणत्याही ठिकाणी अपील न केल्याने निवडणूक प्रक्रियेत अनपेक्षित शांतता पाहायला मिळाली आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता सर्वांची नजर लागली आहे ती चिन्ह वाटपावर, ज्यातून प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. मात्र या वेळी कोणत्याही उमेदवारांनी अर्जांविरोधात अपील न केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे आक्षेप-तक्रारींची गर्दी नव्हती. त्यामुळे प्राथमिक प्रक्रिया विलंब न होता सुरळीतपणे पूर्ण झाली.

दरम्यान, राष्ट्रीय पक्षांकडून अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणारे उमेदवार मात्र आधीच सक्रिय झाले आहेत. कारण—त्यांच्या अर्जासोबतच त्यांचे चिन्ह निश्चित असल्याने त्यांनी जाहीर सभा, घरदार भेटी, मतदार संपर्क आणि सोशल मीडिया मोहिमेला वेग दिला आहे.

याउलट, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडे अंतिम चिन्ह निश्चित होेईपर्यंत प्रचाराला स्पष्ट दिशा देता येत नाही. त्यामुळे या गटांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि प्रतीक्षेचे वातावरण आहे. चिन्ह मिळाल्यानंतरच पोस्टर, बॅनर, मतपत्रिका नियोजन आणि प्रचार साहित्याची अंतिम तयारी करता येणार आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते,

या शांत निवडणूक प्रक्रियेमुळे स्थानिक संघर्षांना आळा बसला आहे,

परंतु चिन्हवाटपानंतर काही ठिकाणी त्रिकोणी किंवा चौरंगी लढती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील मतदारसंघांचे राजकीय समीकरण लक्षात घेता, या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षांची झुंज प्रबळ राहील तर काही नगर परिषदमध्ये स्थानिक गट, अपक्ष किंवा प्रादेशिक पक्षांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

आता फक्त राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांची नजर आहे ती निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या चिन्ह वाटपाच्या घोषणेवर, जी संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट करणार आहे.