भिवंडीतील ट्रकच्या धडकेने अपघातात पाच वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर स्वरूपात जखमी

31

भिवंडीतील ट्रकच्या धडकेने अपघातात पाच वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर स्वरूपात जखमी

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. खादिजा शेख (५) असे मृत मुलीचे नाव असून डॉ.उमर शेख हे गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाड्याकडून नाशिककडे जाणारा ट्रक नदीनाका मार्गे शहरात प्रवेश करत असताना, त्याचवेळी फरीद बाग परिसरातील रहिवासी डॉ. उमर शेख आपल्या मुलीला निजामपूर येथील ‘माझरीन इंग्लिश स्कूल’ मधून घेऊन दुचाकीवरून घरी जात होते. उड्डाणपुलावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत खादिजा दुचाकीवरून पडून थेट ट्रकच्या चाकाखाली आली. गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर विरुद्ध दिशेने फेकले गेल्यामुळे डॉ.उमर शेख गंभीर जखमी झाले. तसेच अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने चालक सिराज कसुवर कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत खादिजाचा मृतदेह स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचेही वातावरण आहे. अपघातग्रस्त ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.