आजपासून आचारसंहिता लागू
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणूकांचे रणशिंग आज फुंकण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची सर्व तयारी जवळपास पुर्ण झालेली आहे. आज सायंकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाची पत्रकार परिषद संपन्न झाली. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर निवडणूकांची घोषणा होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार आज झालेल्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा केल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप १४ डिसेंबर रोजी झाल्यानंतर मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ डिसेंबर नंतर केव्हाही जाहीर होतील. अशी सगळीकडे चर्चा सुरू होती. त्यानुसार पुढील २४ तासात निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. असा अंदाज वर्तविण्यात येत होता. आजची राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ह्या सर्व चर्चांना दुजोरा देणारी ठरली आहे.
राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचे आयोगाने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजी नगरसह प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. एकाच टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणूका होणार असल्याने संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापणार असुन प्रचाराला मोठी रंगत येणार आहे.
त्यास अनुसरून आयोगाने सार्वत्रिक निवडणूकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. नामनिर्देशन पत्र छाननी करण्यासाठी ३१ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक – २ जानेवारी २०२६ आहे. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवार यादी प्रसिध्दीचा दिनांक ३ जानेवारी २०२६ ही आहे. तसेच दिनांक – १५ जानेवारी हा मतदानाचा दिवस असुन दिनांक – १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूकीच्या संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून उमेदवारांची चाचपणी, युती- आघाड्यांचे गणित आणि प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत . राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे एकटक लक्ष लागले होते. निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.









