मराठी शाळा वाचविण्यासाठी मुंबई  महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा 

93

मराठी शाळांकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र येत आहे समोर 

भालचंद्र मुणगेकर, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, अभिनेत्री चिन्मयी सुमित, काॅम्रेड अजित अभ्यंकर, राजन राजे, आनंद भंडारे, डॉ. दिपक पवार, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख साधना गोरे, स्वप्निल थोरात यांनी केलं आंदोलन 

 

अरुणकुमार करंदीकर 

पनवेल शहर प्रतिनिधी 

मो.क्र. 7715918136

पनवेल : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून मराठी शाळा जाणिवपूर्वक बंद करण्याचे कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत मराठी अभ्यास केंद्र आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर नुकताच धडक मोर्चा काढण्यात आला होता. महापालिकेच्या अंतर्गत असणा-या विविध माध्यमांच्या २८ शाळा मागील तीन वर्षात बंद पाडल्या असुन यामध्ये तब्बल १७ मराठी शाळांचा समावेश आहे.ह्याच महाराष्ट्र राज्य सरकारला २ हजार कोटी रुपयांचा खर्च जास्त वाटतो आहे , म्हणून ६६ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासन कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. असे असताना आताही सातत्याने प्रशासनाकडून कट कारस्थान रचून मुंबईतील मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत.

मराठी वाचली पाहिजे, मराठीत बोललं पाहिजे, मराठीत जगलं पाहिजे. ह्यासाठी सगळीकडे गदारोळ सुरू असताना मराठी शाळांकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी शाळा हळूहळू बंद करण्याचा घाट ह्या सरकारने घातला असल्याचे आता लपून राहिलेले नाही. मात्र ह्यासाठी कोणताही राजकीय पक्ष आणि कोणत्याही संस्था, संघटना ठोस आवाज उठवत असल्याचे दिसत नाही. मराठी शाळांच्या इमारतींकडे दुर्लक्ष करून त्यातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये पाठवण्याचे कारस्थान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मराठी शाळांचे अस्तित्व, संवर्धन आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ह्या मागणीसाठी सातत्याने आवाहन करुन सुध्दा आजपर्यंत शासनाने काहीच केलेले नाही. सध्या मराठी शाळांची संख्या घटत असुन अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ह्या पाश्र्वभूमीवर मराठी भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, अपुरी पायाभूत सुविधा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मिळणारे प्राधान्य आणि मराठी विद्यार्थ्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मराठी शिक्षण संकटात सापडले आहे. मराठी अभ्यास केंद्राने ह्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

हुतात्म्यांना केले अभिवादन

मराठी शाळांच्या प्रश्नांवर आयोजित ह्या मोर्चाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून होणार असल्याची माहिती आयोजकांनी पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी यांस मनाई केली. शेवटी तडजोड म्हणून चार – चार जणांनी स्मारकावर जाऊन अभिवादन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, अभिनेत्री चिन्मयी सुमित, काॅम्रेड अजित अभ्यंकर, राजन राजे, आनंद भंडारे, डॉ. दिपक पवार, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख साधना गोरे, स्वप्निल थोरात यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यादरम्यान महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. त्यानंतर हातात फलक घेऊन हा मोर्चा शांततेत मुंबई महापालिकेच्या दिशेने निघाला . मात्र मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी आंदोलकांना ठिकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आंदोलकांच्या हातातील फलक जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते.

सदर मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चेक-यांना ढकलून जबरदस्तीने आझाद मैदानावर ओढून नेण्यात आले. तिथे मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. आयुक्तांशी भेट होत नाही तोपर्यंत तिथेच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. आंदोलक आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उपरोक्त सर्व प्रमुख आंदोलकांना अटक केली तसेच माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, गोवर्धन देशमुख, धन्यवाद शिंदे यांना ताब्यात घेतले . यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते तरीही त्यांनी कोणतेही अनुचित प्रकार घडू दिले नाहीत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना नंतर आझाद मैदानात आणुन सोडून दिले.

याप्रसंगी, आझाद मैदानात सर्व आंदोलक एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडुन शिष्टमंडळाला भेटीची वेळ देण्यात आली. डॉ. दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली चिन्मयी सुमित, आनंद भंडारे, काॅम्रेड प्रकाश परब आणि सुनिल शेजुळे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त भुषण गगरानी , अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आणि आयुक्तांचे अतिरिक्त अधिकारी चवरे यांची भेट घेऊन मराठी शाळांच्या संदर्भातील आपली भूमिका मांडली.