अलिबागचा बालेकिल्ला शेकापने राखला, अक्षया नाईक ६६४० मतांनी विजयी

28

प्रशांत नाईक कुटूंबाचा नगरपालिकातेतील करिष्मा कायम

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्यूरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबागचा बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाने राखला आहे. नाईक कुटूंबाचा नगरपालिकेतील करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. शेकाप नगराध्यक्षपदी अक्षया नाईक विजयी झाल्या आहेत. भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा६६४०मतांनी पराभव करत त्यांनी नगरपालिकेवर चार दशकांपासून असलेले शेकापचे वर्चस्व कायम राखले आहे. अक्षया नाईक या कुटूंबातील सातव्या नगराध्यक्ष असणार आहेत.

नगरपालिकेच्या २० प्रभाग आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे यापुर्वीच बिनविरोध निवडुन आले होते. नगराध्यक्षपदासाठी आणि १९ प्रभागांसाठी २ तारखेला मतदान प्रक्रीया पार पडली होती. दोन प्रभागाचा अपवाद सोडला तर इतर सर्व प्रभागात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष एकत्र आले होते. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत शेकाप काँग्रेस आघाडीला आव्हाने दिले होते.

मतमोजणी आज अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल मध्ये शांततेत पार पडली. शेकापच्या अक्षया नाईक यांना ८ हजार ९७४ मते पडली. तर भाजपच्या तनुजा पेरेकर यांना २ हजार ३३४ मते पडली. ६ हजार ६४० मतांनी नाईक यांनी पेरेकर यांचा पराभव केला. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या तनुजा पेरेकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची भाजपची खेळी फसली. पेरेकर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्या. आमदार महेंद्र दळवी हे शेकापच्या प्रशांत नाईक यांच्याशी असलेल्या नातेसंबधामुळे निवडणुक प्रचारापासून अलिप्त राहिले. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर पालिका निवडणूकीत सत्ता मिळावी यासाठी भाजप शिवसेना युती आग्रही होती. मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात युतीचे उमेदवार अपयशी ठरले. शेकाप काँग्रेस आघाडीने पुन्हा एकदा नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले, शेकापचे संतोष गुरव,संध्या पालवणकर,सुषमा पाटील, डॉ.साक्षी पाटील,आनंद पाटील, अँड. निवेदिता वाघमारे अँड.ऋषिकेश माळी अँड.अश्विनी ठोसर,अँड.मानसी म्हात्रे ,अँड.नीलम हजारे,अनिल चोपडा,योजना पाटील,सागर भगत, शैला भगत,अशा १६ व समीर ठाकूर काँग्रेसचा १ उमेदवार निवडणून आला. विरोधात शिवसेना भाजप युतीचा १ नगरसेवक निवडून आला. भाजपचे शहर अध्यक्ष अंकीत बंगेरा प्रभाग सात मधून निवडून आले. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले. प्रभाग क्रंमाक ४ मधून अँड.संदीप पालकर आणि त्यांची पत्नी अँड. श्वेता पालकर विजयी झाले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत अलिबाग शहरातून शेकापला अपेक्षित मतदान झाली नसले तरी नगरपालिका निवडणूकीत अलिबागकर ठामपणे शेकापच्या पाठीशी उभे राहतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली. नाईक कुटूंबाचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला. नगराध्यक्षपदी वर्णी लागलेल्या अक्षया नाईक या सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या आहेत.