भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रव्यापी पत्र व निवेदन अभियान ३१ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात आयोजन,
केज/प्रतिनिधी
भारतीय जनता मजदूर संघ यांच्या वतीने दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात राष्ट्रव्यापी पत्र व निवेदन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव हे करीत आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश देशातील अंगणवाडी सेविका, आशा व आशा कार्यकर्ती या महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या नियमित,वेळेत व लक्ष्य आधारित कामाच्या स्वरूपानुसार श्रमिक म्हणून वैधानिक ओळख मिळावी,योग्य मानधन तसेच सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्या बाबत भारत सरकारचे लक्ष वेधणे हा आहे.
संघटनेने स्पष्ट केले आहे की,अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यी कडून सातत्याने नियमित स्वरूपाचे काम करून घेतले जाते व त्यांना मानधन दिले जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांनुसार, कामाच्या मोबदल्यात पारिश्रमिक मिळणारी व्यक्ती ही श्रमिकांच्या श्रेणीत मोडते.असे असतानाही आजही या कार्यकर्त्यांना श्रमिकदर्जा, सामाजिक सुरक्षा,आरोग्य विमा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे.
अभियानाची कार्यपद्धती
या अभियानांतर्गत केंद्रीय स्तरावर पत्र मोहीम राबविण्यात येणार असून, संघटनेने तयार केलेल्या समान पत्र प्रारूपावर कार्यकर्ते आपली स्वाक्षरी करून नाव,पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करतील व ते पत्र स्पीड पोस्ट अथवा टपालाद्वारे पंतप्रधान तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यांना पाठविण्यात येईल.त्याच बरोबर जिल्हा स्तरावर कार्यकर्ते समूहबद्ध होऊन जिल्हाधिकाऱ्यांना शांततापूर्ण व मर्यादित पद्धतीने निवेदन सादर करणार आहेत.
पदाधिकाऱ्यांची भूमिका
सर्व पदाधिकाऱ्यांनी अभियानाची माहिती वेळेत प्रत्येक कार्यकर्त्यां पर्यंत पोहोचवणे, अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट व तथ्यात्मक स्वरूपात समजावून सांगणे तसेच संपूर्ण अभियानादरम्यान शिस्त,मर्यादा व संघटनेची शिस्त कायम राखणे आवश्यक असल्याचे संघटनेने आवर्जून नमूद केले आहे.
या अभियानात देशातील सुमारे २७ लाख अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित असून,याव्यापक सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर सकारात्मक संवाद व धोरणात्मक विचारमंथनास चालना मिळेल,असा विश्वास भारतीय जनता मजदूर संघाने व्यक्त केला आहे.
या अभियानात सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, सेवीका,आशा स्वयं सेवीका यांनी सहभागी होऊन पत्रव्यवहार करून जिल्हा व तालुका स्तरावर दि.३१ डिसेंबर रोजी निवेदन देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके भ्रमणध्वनी क्रमांक (९०२१२४३५३५), महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी,(९८२२०९६९७९) मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील (९३२५७०५४५८)यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.









