कल्याणमध्ये गोठ्यात घुसून बिबट्याचा तीन वासरांवर हल्ला

74

कल्याणमध्ये गोठ्यात घुसून बिबट्याचा तीन वासरांवर हल्ला

संजय पंडित

दि.२०,कल्याण: राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला. वसद येथील एका फार्महाऊस मधील गोठ्यात घुसून बिबट्याने तीन वासरांवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात भिती युक्त वातावरण पसरले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसद गाव परिसरातील एका फार्महाऊसमधील गोठ्यात शुक्रवारी पहाटे च्या सुमारास बिबट्याने शिरकाव करीत आठ दिवसीय दोन वासरे आणि एक दीड वर्षीय वासरावर हल्ला केला.

बिबट्या ने केलेल्या हल्यात तिन्ही वासरांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती कल्याण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. संदर्भीत क्षेत्रातील वनपाल राजू शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच कल्याण वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी वसत गावातील नाडर फार्महाऊसवर दाखल झाले असून पंचनामा केला आहे. तर याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था देखील वनविभागाकडुन करण्यात येत आहे.

राज्यभरात बिबट्याचे हल्ले नागरिकांवर होत असल्याने बिबट्यांच्या या हल्ल्यामूळे कल्याणकरांची पुरती तारांबळ उडाली. दोन ते तीन दिवसांपासून हा बिबट्या या परिसरात दिसत असून याबाबत वनविभागाच्या हद्दीचा प्रश्न निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिसाद मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात दक्षता वाढवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहापूर येथील साईवेद हॉटेल समोर हायवे परिसरात काल सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वाहनाने एका बिबट्याला जोरदार धडक दिली. त्या धडकेनंतर बिबट्या काही काळ रस्त्यावर पडलेला होता. मात्र काही वेळातच तो स्वतः उठला आणि परिसरात असलेल्या परिवार हॉटेलच्या दिशेने जाताना दिसून आला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जखमी अवस्थेत असतानाही बिबट्याने हायवेच्या कडेला असलेल्या वस्तीच्या दिशेने हालचाल केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, परिवार हॉटेल परिसरातून तो पुढे सावरोली परिसराच्या दिशेने जाताना पाहण्यात आला आहे.

या घटने नंतर बिबट्या कुठे गेला याबाबत निश्चित माहिती नसली तरी तो जखमी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु जखमी बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच शेतात, मोकळ्या जागेत किंवा निर्जन रस्त्यांवर एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन शहापूर उपविभागीय पोलीस कार्यालय येथून करण्यात येत आहे.

तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वनविभाग, पोलीस प्रशासन किंवा स्थानिक आपत्कालीन यंत्रणेला माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.