अमोल यादवांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा मिळणार!

55

मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करुन त्यामध्ये पहिलं विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे, असं अमोल यादव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल, जो महाराष्ट्रात सुरु होत आहे.
20 नोव्हेंबर रोजीच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचं पत्र देण्यात आलं होतं.
विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्याने उड्डाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.
अमोल यादवांच्या पहिल्या स्वदेशी विमानाला लालफितीचा ब्रेक
2011 म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहोचवला होता.
महाराष्ट्र सरकारने या धडपडीचं कौतुक करत अमोल यांना 19 आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिला होता. अमोल यांनी 19 आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे. पण त्याआधी 6 आसनी विमानाचं यशस्वी उड्डाण करुन दाखवणं त्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.
ज्या प्रक्रियेसाठी भारतात 6 वर्षे गेली, ती अमेरिकेत एका महिन्याच्या आतही पूर्ण होऊ शकली असती. पण नोंदणी अमेरिकेत झाल्यास ते विमान स्वदेशी राहणार नाही, या भावनेतून अमोल यादव थांबले होते.