Home latest News झुडपी जंगलातील अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणार – आमदार विनोद अग्रवाल

झुडपी जंगलातील अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणार – आमदार विनोद अग्रवाल

18

गोंदिया, १४ मे

गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील वनविभागाच्या झुडपी जंगल क्षेत्रात १९९६ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी जमीन मालकी हक्क मिळावेत यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रयत्नांना वेग दिला आहे. यापूर्वी शासनाच्या जागेवर राहणाऱ्या सुमारे ४ हजार २०० हून अधिक ग्रामीण नागरिकांना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते कायमस्वरूपी पट्टे देण्याचा उपक्रम आमदार विनोद अग्रवाल यांच्या संकल्पातून यशस्वी करण्यात आला होता. आता झुडपी जंगल क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या सुमारे १० हजार शहरी व ग्रामीण अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याच्या निर्धाराने श्री. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार विनोद अग्रवाल यांनी एसडीओ, तहसीलदार, पंचायत समितीचे बीडीओ, नगरपरिषदचे सीओ, तलाठी व ग्रामसेवकांना निर्देश दिले आहेत की, शहरी तसेच ग्रामीण भागातील झुडपी जंगलाच्या जागेवर १९९६ पूर्वीपासून राहत असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून प्रस्ताव तत्काळ वनविभागाकडे सादर करावा. १९९६ पूर्वीचे सर्व अतिक्रमणधारक नियमबद्ध करण्यासाठी अतिशय लवकर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले, “१९९६ पूर्वीच्या झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे. एकही व्यक्ती जमीन हक्कांपासून वंचित राहू नये, हा माझा प्रयत्न आहे.”