संकलन : संजय पंडित
“आला अधिक मास… धोंड्याचा सण देणार जावयाला सोन्याचा घास”
आपल्या भारतीय परंपरेत आणि हिंदू संस्कृतीत प्रत्येक नात्याचा सन्मानाने आदर केला जातो. त्यामुळे प्रत्येक नात्यातील परस्पर ऋणानुबंध अधिक दृढ होतात आणि नाती विश्वासाने अधिक घट्ट बनतात. “जावई” हे नातं विशेष जिव्हाळ्याचं मानलं जातं. हे नातं पूर्वापार आदराने जपलं गेलं आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक नाती ही प्रतिक, उत्सव आणि पारंपरिक माध्यमातून व्यक्त करण्याची परंपरा आहे. काळानुसार या परंपरांमध्ये काही बदल झाले असले तरी नात्यांमधील गोडवा आणि आपुलकी आजही कायम आहे.
अधिक मासात साजरा केला जाणारा “धोंड्याचा सण” हा मराठमोळ्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मानला जातो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पवित्र महिन्यात मुलीच्या माहेरकडून जावयाचा विशेष मान-सन्मान केला जातो. या सणामुळे माहेर आणि सासर या दोन घरांतील नाते अधिक दृढ होते.
भगवान विष्णूच्या पुरुषोत्तम मासात जावयाला लेकीसह घरी बोलावून आदरातिथ्य केले जाते. विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी हा सण अत्यंत खास मानला जातो. जावयाला ३३ दिव्यांनी औक्षण करून ३३ अनारसे, पुरणाचे धोंडे तसेच वाण दिले जाते. काही ठिकाणी चांदीचा किंवा तांब्याचा निरंजन दिवा देण्याचीही परंपरा आहे.
या महिन्यात भगवान विष्णूची पूजा, पुरुषोत्तम कथा, भागवत, कीर्तन, दानधर्म आणि धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. तसेच अन्नदान, वस्त्रदान आणि सामूहिक पूजांचे आयोजनही केले जाते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास हा सुमारे ३२ महिने १६ दिवसांनी येतो. त्यामुळे प्रत्येक तीन वर्षांनी हा अतिरिक्त महिना येतो. या महिन्यात शुभकार्य टाळले जात असले तरी धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या त्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
धोंड्याचा सण हा आधुनिक काळातही नाती, संस्कृती आणि परंपरा जपणारा एक आनंदोत्सव म्हणून ओळखला जातो. यावर्षी अधिक मास १७ मेपासून सुरू होत असून १५ जून २०२६ रोजी त्याचा समारोप होणार आहे. त्यामुळे यावर्षी दोन ज्येष्ठ महिने आले असून वटपौर्णिमेसारखे काही सण पुढे ढकलले जाणार आहेत.









