दादासाहेब फाळके चित्रनगरीतलं हॉटेल बंद करण्याचा कपटी चाल, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचं उपोषण.
संदीप साळवी प्रतिनिधी
मुंबई 26 फेब्रुवारी :- ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार लक्ष्मण गायकवाड आपल्या पत्नीसह सत्याग्रहाला बसले आहे. कारण आहे दादासाहेब फाळके चित्रनगरीतील त्यांचं हॉटेल. गेल्या 25 वर्षांपासून गायकवाड चित्रनगरीत हे हॉटेल चालवतात. मात्र, आता अचानक त्यांना जास्तीचं भाडं मागून तसंच थकीत रक्कम असल्याचं सांगत त्यांचं हॉटेल बंद करण्यात आलं आहे. याच विरोधात आवाज उठवत लक्ष्मण गायकवाड आणि त्यांच्या पत्नी कामगारांसह ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.
लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितलं, की गेल्या 25 वर्षांपासून ते याठिकाणी हॉटेल चालवतात. याच हॉटेलवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र, 2017 साली करार करुन व्यापारी तत्त्वानं याचं भाडं भरत असतानाही काही अधिकाऱ्यांनी येऊन 3 लाख रुपये भाडं मागत थकीत रक्कम दाखवून हॉटेल बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझं हॉटेल बंद करून इतरांना ते देण्याचा कुटील डाव आखला जातोय, असा आरोप त्यांनी केला आहे. सोबतच न्यायासाठी त्यांनी सरकारला साकडंही घातलं आहे.
लक्ष्मण गायकवाड म्हणाले, की रात्री 12 वाजतानंतर हॉटेलमधील नळ कनेक्शन कपात करण्यात आलं आणि माझं हॉटेल बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला. या हॉटेलच्या माध्यमातून मी अनेकांना रोजगार दिला असून या कामगारांच्या रोजगारावरही संकट येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे माझ्या चाहत्यांनी आणि माध्यमांनी याची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगून हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या आपण हॉटेल बंद केलं असून कामगारांसह ठिय्या आंदोलनाला बसलो असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.