विदर्भात सहा महिन्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बळीराजाचे प्रश्न कधी सुटणार?

नागपूर:- दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या विदर्भात शेतकरी आत्महत्येविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षभरापासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीये. तसेच या भागात मागील दहा वर्षांत तब्बल 4612 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने कायम ग्रासलेला असतो. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती तर जास्तच गंभीर आहे. पर्जन्यमान कमी असल्यामुळे या भागात पाण्याची प्रचंड टंचाई कायम असते. विदर्भात तर ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पाऊसपाणी नसल्यामुळे येथील शेतकरी कायम त्रस्त असतात. तसेच, काबाडकष्ट करुन म्हणावा तसा पैसा न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर दिवसेंदिवस वाढतायत. परिणामी विदर्भात आर्थिक विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एकट्या पूर्व विदर्भात मागील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तसेच एकट्या जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी गळफास घेतलाय. नापिकी, कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना अशी विविध कारणं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहेत.
दरम्यान, राज्यात विदर्भच नव्हे तर इतरही भागातील शेतकरी सध्या त्रस्त आहेत. वाढीव वीजबिलामुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत आहेत. तसेच नापिकी, अतिवृष्टी या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केलाये. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना म्हणावी तशी मदत होताना दिसत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार?, हा प्रश्न विचारण्यात येतोय.