अहमदनगर :भाजपमधून बडतर्फ करण्यात आलेला श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा अहमदनगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या छिंदम याला यापूर्वीच भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. उपमहापौरपदानंतर त्याचे नगरसेवक पदही रद्द करावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे.
महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले. बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला छिंदमने कामासंबंधी फोन केला होता. फोनव र बोलताना त्या कर्मचाऱ्याने ‘शिवजयंती होऊ द्या, मग तुमचे काम मार्गी लावू’ असे सांगितले. याचा राग येऊन छिंदम यांनी शिवराय आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरले. त्याची क्लिप व्हायरल होताच अहमदनगरमध्ये संतापाची लाट उसळली होती. सर्वच पक्षांनी छिंदमचा निषेध केला. छिंदमचे नगरसेवक पदही रद्द करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. स्थायी समितीने महापौर कदम यांना पत्र लिहून याप्रकरणी विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली आहे.