नागपूरात दारुड्या बापाने पोटच्या 2 वर्षांच्या मुलीचा ब्लेडने चिरला गळा.

59

नागपूरात दारुड्या बापाने पोटच्या 2 वर्षांच्या मुलीचा ब्लेडने चिरला गळा.

In Nagpur, a drunken father slit the throat of his 2-year-old daughter with a blade.
In Nagpur, a drunken father slit the throat of his 2-year-old daughter with a blade.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒

नागपूर, 02 मार्च:- पती-पत्नीच्या वादातून नराधम जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केली. मुलीचा हत्या केल्यानंतर पित्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे गणेशपूर परीसरातील जनतेचे मन हेलावून गेले.

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर येथे सोमवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास घडली. मृतक राधिका सयाम अवघ्या दोन वर्षांची असल्याने तिला ज्या यातना झाल्या असेल त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किशोर सयाम हा नराधम या घटनेतला आरोपी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा पत्नी पूजा आणि दोन वर्षांची मुलगी राधिकासह गणेशपूर येथे दास यांच्याकडे भाड्याने राहत होते. ते मूळचे उमरवाही, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर येथील राहणारे आहेत. काही दिवसांपासून किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन मारहाण करायचा. नेहमी सोडचिठ्ठीची मागणी करायचा. सोमवारी तो सकाळपासून दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. याची तक्रार देण्यासाठी पूजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली तेव्हा राधिका आणि आरोपी किशोर घरीच होते.

पत्नी जेव्हा पोलिसांना घेऊन घरी गेली तेव्हा मुलगी राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. किशोर देखील जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी तत्काळ मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. परंतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे. किशोरला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.